धुळे : उत्तर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याकडे पाहिले जाते. तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात असताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या समस्या या कायम असल्याच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी बोलले जाते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात (Dhule City Assembly Constituency) यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे. महाविकास आघाडीकडून (mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांना रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्याविरोधात महायुतीतून (Mahayuti) भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल (Anup Agrawal) यांचे आव्हान असणार आहे. तसेच एमआयएमचे विद्यमान आमदार फारूक शाह (Faruk Shah) हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.


धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 2009 साली लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून अनिल गोटे हे 59 हजार 576 मतांनी विजयी झाले होते. तर 2014 साली अनिल गोटे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल 57 हजार 780 मते मिळवत विजय प्राप्त केला होता. तर 2019 च्या निवडणुकीत अनिल गोटे यांना तसेच सर्व हिंदू उमेदवारांना पराभवाची धूळ चाखत एमआयएमचे आमदार फारुक शहा हे 46 हजार 679 मते मिळवत विजयी झाले होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून प्रथमच मुस्लिम धर्मीय उमेदवार विजयी झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. 60 ते 70 टक्के हिंदू बहुल असलेला धुळे शहर विधानसभा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात गेल्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील हिंदू उमेदवारांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. 2019 च्या निवडणुकीत धुळे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला होता 79 पैकी तब्बल 50 नगरसेवक हे भाजपचे विजयी झाल्यानंतर लोकसभेत देखील भाजपला घवघवीत यश मिळाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेले यश तसेच राज्यात आणि केंद्रात असलेली भाजपची सत्ता यामुळे शहराचा कायापालट होईल अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त होत होती. मात्र, शहरातील रस्ते पाणी आणि गटारी यासह मूलभूत सोयी सुविधांच्या समस्या आजही मोठ्या प्रमाणावर असल्याने या समस्यांचा निपटारा करण्याचे आव्हान विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारासमोर असणार आहे. 


2019 च्या निवडणुकीत एमआयएमचा विजय


धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अनिल गोटे यांना 2009 आणि 2014 या दोन विधानसभा निवडणुकीत शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती, मात्र 2019 च्या निवडणुकीत अनिल गोटे यांनी भाजपची साथ सोडत पुन्हा एकदा लोकसंग्रामच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना 2019 च्या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला, तर अपक्ष उमेदवार असलेले राजवर्धन कदम मंडे यांना 43 हजार 372 मते मिळाली होती. 2019 साली राज्यात शिवसेना-भाजपची महायुती असल्याने धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला देण्यात आली होती, ही जागा भाजपला मिळावी असा आग्रह त्यावेळी करण्यात येत होता. मात्र, परंपरेनुसार ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले हिलाल माळी यांना महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली होती, या निकालात सर्वच राजकीय पक्षांना धूळ चारत एमआयएमचे फारुक शाह हे विजयी झाले होते.


तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 


2024 च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल गोटे यांना संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजपने अनुप अग्रवाल यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. एमआयएम पक्षाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार फारुक शाह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एमआयएमला पराभूत करून आपल्या पक्षाचा झेंडा धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर फडकविण्याचे आव्हान भाजपसह ठाकरे गटासमोर उभे राहिले आहे. आता या तिरंगी लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: यंदा पेणमध्ये कोण बाजी मारणार?