मुंबई : राज्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सर्वाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे 23 तारखेकडे. या दिवशी महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी कुणाकडे, सत्तेचे मुकूट कुणाकडे याचा फैसला होणार आहे. राज्यातल्या राजकारणात कायमच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विदर्भामध्ये यावेळी चुरशीने मतदान झाल्याचं दिसून आलं. विदर्भात राज्यातील 62 मतदारसंघ असून या भागातून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी काँग्रेसने आणि भाजपने जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून आलं. 


लाडकी बहीण योजना, मोफत वीज असे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून उचलण्यात आले तर विरोधी महाविकास आघाडीकडून सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न उचलण्यात आले. तसेच विदर्भातील वाढती गुन्हेगारी यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलं. 


राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या विदर्भात अशा काही लढती झाल्या की ज्याच्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्र्यांचा सहभाग आहे.  


विदर्भातील बिग फाईट्स कोणत्या?


नागपूर 


नागपूर दक्षिण पश्चिम - भाजपचे देवेंद्र फडणवीस विरुद्ध काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील 
रामटेक - शिवसेना शिंदेचे आशिष जयस्वाल विरुद्ध शिवसेना ठाकरेचे विशाल बरबटे विरुद्ध काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक अशी तिहेरी लढत.  
सावनेर - भाजपचे आशिष देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या अनुजा सुनील केदार 
काटोल - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सलील देशमुख विरुद्ध भाजपचे चरणसिंग ठाकूर 
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर 


भंडारा जिल्हा 


साकोली - काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध भाजप बंडखोर सोमदत्त करंजेकर.   


गोंदिया जिल्हा 


गोंदिया - भाजपचे विनोद अग्रवाल विरुद्ध काँग्रेसचे गोपाळ अग्रवाल. 


वर्धा जिल्हा 


आर्वी - भाजपचे सुमित वानखेडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मयुरा काळे 


चंद्रपूर जिल्हा 


बल्लारपूर - भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसचे संतोष रावत 
ब्रम्हपुरी - काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे 


गडचिरोली जिल्हा 


अहेरी - राष्ट्रवादी अजित गटाचे राजे धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम विरुद्ध भाजप बंडखोर अंबरीश आत्राम अशी तिहेरी लढत.  


यवतमाळ जिल्हा 
 
दिग्रस - शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे. 
पुसद - राष्ट्रवादी अजितचे इंद्रनील नाईक विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद मैंद  


अमरावती जिल्हा 


बडनेरा - युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सुनील खराटे विरुद्ध प्रीती बंड विरुद्ध भाजप बंडखोर तुषार भारतीय.
तिवसा - काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे राजेश वानखेडे. 
मोर्शी - राष्टवादी अजित गटाचे देवेंद्र भुयार विरुद्ध भाजपचे चंदू यावलकर अशी महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढत.
अचलपूर - प्रहारचे बच्चू कडू विरुद्ध भाजपचे प्रवीण तायडे विरुद्ध काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख.     


अकोला जिल्हा 


बाळापूर -शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख विरुद्ध शिवसेना शिंदेचे बळीराम शिरस्कार विरुद्ध वंचितचे सय्यद नातिकुद्दीन खतीब 
अकोला पश्चिम - काँग्रेसचे साजिदखान पठाण विरुद्ध भाजपचे विजय अग्रवाल विरुद्ध भाजप बान्धखोर आणि प्रहारचे डॉ अशोक ओळंबे 


बुलढाणा जिल्हा 


बुलढाणा - शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके.
शिंदखेडा राजा - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिवसेना शिंदेंचे डॉ. शशिकांत खेडेकर. 
खामगाव - भाजपचे आकाश फुंडकर विरुद्ध काँग्रेसचे दिलीप सानंदा.   


वाशीम जिल्हा - 


रिसोड - शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे अमित झनक विरुद्ध भाजप बंडखोर अनंतराव देशमुख    


विदर्भात प्रामुख्याने प्रचारातले मुद्दे - 


महायुतीकडून लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज असे मुद्दे उचलले गेले. प्रचाराच्या शेवटी आणि खासकरून पश्चिम विदर्भात व्होट जिहादचा मुद्दा आणला गेला. तर पूर्व विदर्भात शहरी नक्षलवाद आणि काँग्रेसचे संबंध हा मुद्दा भाजपकडून उचलला गेला.


महाविकास आघाडीकडून महिला विरोधात घडणारे गुन्हे, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या दुरवस्था आणि पक्ष फोडीचे राजकारण असे मुद्दे उचलले गेले.