CM Eknath Shinde : आज राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र पार पडत असताना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाणे आणि मुंबईतील अनेक मतदारसंघात आढावा घेत होते. दरम्यान, मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जाताना, मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा सायंकाळी 5 च्या सुमारास वरळी मतदारसंघात घुसवल्याचे पाहायला मिळालं. वरळीतील मतदान केंद्र आणि पदाधिकार्यांशी मुख्यमंत्र्यानी संवाद साधला.
शेवटचा तास उरला असताना मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीत
मतदान संपण्यास शेवटचा तास उरला असताना, मुख्यमंत्री ठाण्याच्या दिशेने रवाना होतं होते, यावेळी जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा वरळीत फिरवला. जवळपास अर्धातासहून अधिक वेळ मुख्यमंत्री वरळीत होते. मुख्यमंत्र्याच्या वरळीतील या धावत्या भेटीने आदीत्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी सत्तांतरानंतर आदीत्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यात जाऊन आवाहन दिलं होतं. आदीत्य ठाकरेंनी शिंदेंना त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचं आवाहन दिलं होतं.
वरळी विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष
वरळी विधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुत्र युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच मनसेचे संदीप देशपांजडे हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून अमोल आनंद निकाळजे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी खरा सामना हा आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवर यांच्यातच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या जागेकडे विशेष लक्ष दिलं आहे. मात्र, या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणारे हे आपल्याला येत्या 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, काही ठिकाणी कमी मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झालं आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंतर आता उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदारांनी मताचं दान कोणाच्या पारड्यात टाकलं हे जरी 23 नोव्हेंबरला समजणार असलं तरीदेखील एक्झिट पोलचे ( Exit Polls) आकडे समोर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात