Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधक मान्य करायला तयार नाहीत. आता बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (UBT) ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा निकालाबाबत बोलताना जाहीरपणे विरोध दर्शवला आहे, जोपर्यंत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत आम्ही निकाल स्वीकारणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ईव्हीएमवर कोण प्रश्न उपस्थित करत आहे? 10 वर्षांपासून आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. काँग्रेसचे सरकार असताना भाजपने प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही मोदीजींचे भाषण ऐका, ईव्हीएम ही देशाची फसवणूक आहे. संजय राऊत (Sanjay Raut) पुढे मोठा दावा करत म्हणाले की, जेव्हा ईव्हीएम नसतील तेव्हा देशात भाजपला देशात 25 जागाही मिळणार नाहीत. महाराष्ट्राचे निकाल ज्या प्रकारे आले आहेत, हरियाणाचे निकाल ज्या प्रकारे आले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जे निकाल येतील ते आम्ही स्वीकारू, असंही ते पुढे म्हणाले आहेत.
संसदेकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही - संजय राऊत
विरोधी पक्ष ईव्हीएमचा मुद्दा संसदेत मांडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ज्या सभागृहात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षनेत्याचा माईक बंद केला जातो, त्या सभागृहात आम्हाला काय न्याय मिळणार. सर्वोच्च न्यायालय आपल्याला न्याय देत नसताना संसद आम्हाला काय न्याय देणार आहे? महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत होती, मात्र या दाव्याच्या विरोधात मिळालेल्या जागा निराशाजनक आहेत, शिवाय महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही निसटत्या मतांनी निवडणूक जिंकता आली आहे.
हरियाणातही काँग्रेसला विजयाची अशीच आशा होती, पण भाजपने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या आहेत. त्यावेळीही त्यांनी ईव्हीएममधील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता.
राज ठाकरे देखील लवकरच करणार ईव्हीएमवर भाष्य
राज्यभरातून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, अशातच मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, मोठ्या पराभवानंतर राज ठाकरेंनी बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी सर्व उमेदवारांचं म्हणण ऐकूण घेतलं. मात्र, त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही. ते त्याबाबत आणि ईव्हीएमवर लवकरच आपली भूमिका मांडतील.