Karjat Vidhansabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघांमध्ये (Karjat Vidhansabha Constituency) राजकीय वातावरण मागील दिवसांपासूनच तापलेले असून या मतदार संघात सर्व पक्षीय कार्यकर्ते विधानसभेची उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे विद्यमान आमदार असलेले महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांना देखील या मतदार संघात अनेक बंडाला सामोरे जावे लागत आहे. कारण महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या शिलेदारकडून महेंद्र थोरवे यांच्याविरोधात शक्तिप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे या मतदार संघात युती विरूद्ध आघाडी अशी लढत होईल अशी चर्चा होती. मात्र आता येथील चित्र बघता यंदाच्या विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघात चौरंग लढत होणार असून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार महेंद्र थोरवे, अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून सुधाकर घारे, भाजपकडून किरण ठाकरे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नितीन सावंत आणि डॉ. सुनील पाटील हे आमदारकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


शिवसेनेचे उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी नुकतीच मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर उद्धव ठाकरे यांनी मला सुद्धा कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचे सूतोवाच नितिन सावंत म्हणत आहेत. मात्र या मतदार संघात 65 टक्के सकल मराठा समाज असल्यानं याचा फायदा मलाच होईल असे वक्तव्य मराठा समाजाचे राज्य समन्वयक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख डॉ. सुनील पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीचा वाद समोर दिसत असताना आता महाविकास आघाडीत देखील उमेदवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी रस्सीखेच सूरू आहे. त्यामुळे काहीही झालं तरी या मतदार संघात माझ्याच नावाचा विचार केला जाईल आणि मला या मतदार संघात जास्त अनुभव असल्यानं त्याचा फायदा मला होईल अस सुध्दा वक्तव्य डॉ सुनील पाटील यांनी केलं आहे. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?


2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. कर्जत हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जतमधून एकुण 11 उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशभाऊ नारायण लाड यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये महेंद्र थोरवे यांनी बाजी मारत सुरेशभाऊ लाड यांचा पराभव केला. महेंद्र  थोरवे यांनी या मतदारसंघात पहिल्यांदा एक लाख मतदानाचा टप्पा पार केला. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात 70.81 टक्के मतदान झाले होते. कर्जत मतदारसंघात कधीही कोणताही उमेदवार सलग तीन वेळा निवडून आले नाहीत, ते आमदार सुरेश लाड यांच्या पराभवाने 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.


2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काय घडलं?


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. सुनील तटकरे यांनी 508352 मते मिळवत अनंत गिते यांचा पराभव केला. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक 82,784 मतांनी जिंकली. तर ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना 425568 मते मिळाली. त्यामुळे सुनील तटकरे हे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.


गेले दोन वर्षांत अनेक राजकीय भूकंप-


गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संबंधित बातमी:


रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती