सातारा :  सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील विजयी झाले आहेत. मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव झाला आहे. मकरंद पाटील यांना 140971 इतकं मतदान झालं आहे. तर, अरुणादेवी पिसाळ यांना 79579 मतं मिळाली आहेत. मकरंद पाटील यांनी 61392 मतांनी विजय मिळवला.    


मकरंद पाटील यांचा चौकार


वाई मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील निवडणूक लढणार हे स्पष्ट होतं. शरद पवारांच्या पक्षाकडून अरुणादेवी पिसाळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. अखेरच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झाल्यानं अरुणादेवी पिसाळ यांना प्रचाराला फार मुदत मिळाली नव्हती. मकरंद पाटील यांनी सलग चौथ्यांदा विजय होत वाईचे आमदार म्हणून विजयाचा चौकार मारला आहे.    


मकरंद पाटील यांच्या विजयाचा चौकार


सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघात 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी लढत पाहायला मिळाली होती.  2004 च्या निवडणुकीत मदन भोसले यांनी मकरंद पाटील यांचा पराभव केला होता. तर, मकरंद पाटील यांनी पुढच्या तीन निवडणुकांमध्ये मदन भोसले यांना पराभूत केलं होतं. यावेळी मदन भोसले निवडणुकीला उभे नव्हते. मकरंद पाटील यांनी अरुणादेवी पिसाळ यांचा 61392 मतांनी पराभव करत विजयाचा चौकार मारला आहे. 


मकरंद पाटील यांच्या विजयाची कारणं


मकरंद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मकरंद पाटील यांचा मतदारसंघातील जनसपंर्क, किसनवीर साखर कारखाना पुन्हा सुरु करणं. विरोधात तुल्यबळ उमेदवार वेळेत जाहीर न होणं. मकरंद पाटील यांच्याशिवाय त्यांचे बंधू नितीनकाका पाटील हे जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत. तर, काही महिन्यांपूर्वी त्यांना राज्यसभा खासदार देखील करण्यात आलं होतं. त्यामुळं अजित पवार यांनी मकरंद पाटील यांना बळ देण्याची भूमिका कृतीतून दाखवल्यानं मकरंद पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. 


दरम्यान, महाविकास आघाडीला सातारा जिल्ह्यात एकाही मतदारसंघातून विजय मिळवता आलेला नाही. महाविकास आघाडीला लोकसभेला या जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील तीन जागांवर आघाडी मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.


इतर बातम्या :


विधानसभेची खडाजंगी: साताऱ्यात लोकसभेला महायुतीची सरशी, महाविकास आघाडीला तगडी फाईट द्यावी लागणार, जाणून घ्या आमदारांची यादी