सातारा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीला यश मिळालं. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ दोन लोकसभा मतदारसंघात येतात. साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयी झाले. तर, माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघ येतात. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. सातारा जिल्ह्यात सातारा, माण, फलटण, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण हे विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. तर, दुसरीकडे भाजप शिवसेनेची युती होती. काँग्रेस राष्ट्रवादीनं चार जागा जिंकल्या होत्या तर भाजप आणि सेनेनं चार जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या विधानसभेनंतर राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत, शिवसेनेत दोन गट पडलेत त्याचा परिणाम साताऱ्यातील समीकरणांवरदेखील झाला आहे. सातारा जिल्ह्यात बदलेल्या समीकरणाप्रमाणं महायुतीचे सहा आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीकडे दोन आमदार आहेत.
साताऱ्यात 2019 ला काय घडलं? (Satara VidhanSabha Election)
सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांच्यात लढत झाली होती. शिवेंद्र राजे भोसले यांनी या ठिकाणी विजय मिळवला होता. शिवेंद्रराजे भोसले यांना 1 लाख 18 हजार 5 मतं मिळाली होती. तर दीपक पवार यांना 74 हजार 581 मतं मिळाली होती. या मतदारसंघात भाजपकडून पुन्हा शिवेंद्रराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी मिळेल तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दीपक पवार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सचिन मोहिते यांची नावं चर्चेत आहेत.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ (Karad North Seat)
कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांचं आव्हान होतं. बाळासाहेब पाटील यांनी 1 लाख 509 मतं मिळवली होती. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 51 हजार 294 मतं मिळाली. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम तिसऱ्या स्थानी राहिले होते. त्यांना 31 हजारत 791 मतं मिळाली होती. विरोधकांचं मतविभाजन झाल्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला होता. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात धैर्यशील कदम किंवा मनोज घोरपडे यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळणरा याकडे लक्ष लागलंय.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Karad South Vidhan Sabha Seat)
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या अतुल भोसले यांचा पराभव केला होता. इथं देखील तिरंगी लढत झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांना 92 हजार 296 मतं मिळाली. भाजपच्या अतुल भोसले यांना 83166 तर अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना 29401 मतं मिळाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवण्यात यश मिळवला.आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणूक लढवणार की उदयसिंह पाटील यांना संधी मिळणार हे पाहवं लागेल. भाजपकडून अतुल भोसले यांचं नाव चर्चेत आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघ (Patan Vidhan Sabha Seat)
पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई विजयी झाले होते. या मतदारसंघात दुरंगी लढत झाली होती. पाटणमध्ये शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीतसिंह पाटणकर अशी लढत झाली होती. शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 मतं मिळाली होती तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती. पाटणमध्ये पुन्हा एकदा दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. देसाई पाटणकर यांच्यातच या मतदारसंघात लढत होऊ शकते.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ (Koregaon Vidhan Sabha Seat)
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले होते. महेश शिंदे यांना 1 लाख 1 हजार 487 मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 95 हजार 205 मतं मिळाली होती. या मतदारसंघात पुन्हा एकदा महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात लढत पाहायला मिळू शकते.
वाई विधानसभा मतदारसंघ (Wai Vidhan Sabha Seat)
वाई मतदारसंघात भाजपचे मदन भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. मकरंद पाटील यांनी या लढतीत विजय मिळवला होता. मकरंद पाटील यांना 1 लाख 30 हजार 486 मतं मिळाली होती. तर विरोधी उमेदवार मदन भोसले यांना 86 हजार 839 मतं मिळाली होती. लोकसभेला या मतदारसंघात नेते महायुतीच्या बाजूनं असले तरी मविआनं बाजी मारली होती. त्यामुळं मकरंद पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Vidhan Sabha Seat)
फलटण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण आणि भाजपच्या दिगंबर आगवणे यांच्यात लढत झाली होती. दीपक चव्हाण यांनी विजय मिळवला होता, त्यांना 1 लाख 17 हजार 617 मतं मिळाली होती. भाजपच्या दिगंबर आगवणे यांना 86 हजार 636 मतं मिळाली होती. आमदार दीपक चव्हाण हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत. ते सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून महायुतीसोबत आहेत.
माण विधानसभा मतदारसंघ
माण विधानसभा मतदारसंघात 2019 ला तिरंगी लढत झाली होती. भाजपचे जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख आणि शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्यात तिरंगी सामना झाला होता. अटीतटीच्या लढतीत जयकुमार गोरे विजयी झाले होते. जयकुमार गोरे यांना 91469 मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर देशमुख यांना 88 हजार 426 मतं मिळाली होती. शेखर गोरे यांना 37 हजार 539 मतं मिळाली होती. या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात मविआ तर पाच मतदारसंघात महायुती आघाडीवर होती. यामुळं विधानसभेची लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :