अहमदनगर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Shrirampur Assembly Constituency) महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील लहू कानडे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सभा घेणार होते. मात्र आज होणारी सभा अचानक रद्द झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा अचानक रक्तदान वाढला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात होते. मात्र, आता भाऊसाहेब कांबळे रुग्णालयातून थेट मतदारसंघात दाखल झाले असून व्हीलचेअरवर बसून त्यांनी अनोखा प्रचार केला. भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी लहू कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सभा घेतली होती. या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी आज सभा पार पडणार होती. मात्र, एकनाथ शिंदे यांची सभा अचानक रद्द करण्यात आली. नियोजित सभा ऐनवेळी रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे यांचा रक्तदाब वाढला होता.
व्हीलचेअरवर बसून अनोखा प्रचार
त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्राथमिक उपचार घेऊन सलाईनसह व्हीलचेअरवर बसून भाऊसाहेब कांबळे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून हेमंत ओगले, महायुतीकडून लहू कानडे आणि भाऊसाहेब कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरोधात महायुतीचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाऊसाहेब कांबळेंचा विखे पाटलांवर टीका
दरम्यान, जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे. मला उमेदवारी देणारे हेच लोकं आणि मागे घ्यायला लावणारे हेच लोकं आहेत, असे म्हणत भाऊसाहेब कांबळे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर नाव न घेता टीका केली आहे. पक्षाने मला एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे मी धनुष्यबाणाची उमेदवारी करणारच आहे. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते तर मी माघार घेतली असती. सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. मी निवडणूक लढवणारच आहे, असेही भाऊसाहेब कांबळे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
अजित पवार म्हणाले 1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार; आता, युगेंद्र अन् रोहित पवारांचा पलटवार