मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधुम सुरु असताना मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भावना दुखावल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्याशी बांद्रा येथील मतदान केंद्रात दुजाभाव झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे (Election Commission) करण्यात आली आहे.
रामदास आठवले बुधवारी दुपारी वांद्रे पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नवजीवन विद्या मंदिर येथील मतदान केंद्रांवर गेले होते. याठिकाणी मतदान केंद्रात मतदान करताना अनेक उमेदवार आणि नेत्यांचे फोटो काढण्यात आले. मात्र, रामदास आठवले मतदान करताना त्यांच्यासोबत एकाही फोटोग्राफरला आतमध्ये सोडण्यात आले नाही. निवडणूक आयोगाने अधिकृत परवानगी दिलेला ओळखपत्र पास असणाऱ्या एका फोटोग्राफरला आत सोडावे, अशी वारंवार विनंती केल्यानंतरही पोलिसांनी एकाही फोटोग्राफर ला आत सोडण्यास मनाई केली. हा रिपब्लिकन पक्षाशी दुजाभाव झाल्याची भावना आठवलेंच्या समर्थकांमध्ये पसरली. या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून रामदास आठवले यांच्या कार्यालयाने वांद्रे विधानसभा मतदारसंघ नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावरील तैनात पोलिसांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग याबाबत काही कारवाई करणार का, हे बघावे लागेल.
उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मतदान केंद्रांना भेटी
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर उद्धव ठाकरे मुंबईतील विविध मतदान केंद्रांना भेटी देत फिरत आहेत. काहीवेळापूर्वीच त्यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या शाखेला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांकडून मतदान कसे चालले आहे, याबाबत माहिती घेतली. तसेच 23 तारखेला जोगेश्वरी पूर्वमधून गुलाल आपला उधळायचा आहे, अशा विश्वासदेखील व्यक्त केली आहे.
नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांचे समर्थक भिडले
भाईंदर पश्चिम येथील 60 फिट रोडवर नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्या समर्थकांमध्ये एक छोटीशी बाचाबाची झाली. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या बुथजवळ उपस्थित होते. दोन्ही गटांमध्ये तणाव वाढल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पण स्थानिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आणखी वाचा
महाडमध्ये मतदानाच्या दिवशीच भानामतीचा प्रकार, नाक्यावरील करणीमुळे उमेदवारांना धाकधूक
राज्यात दुपारी 3 पर्यंत चुरशीने मतदान, गडचिरोलीत सर्वाधिक 63 टक्के तर ठाणे-मुंबईत सर्वात कमी मतदान