रत्नागिरी :एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.उद्धव ठाकरेंनी देवा भाऊ, दाढीवाला भाऊ आणि जॅकेटवाला भाऊ मिळून जाऊ तिथे खाऊ अशी टीका केली होती. या टीकेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेची सत्ता उपभोगली तेव्हा तुम्ही हेच केलं का ? असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
उद्धव ठाकरे यांना विधिमंडळही कळत नाही आणि राजकीय मैदाने कशी वाजवायची हे पण कळत नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली. विधिमंडळात शिवाजी पार्कवर भाषण केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात भाषणे केली, असं रामदास कदम यांनी म्हटलं.
दाढीवाला बाबा आणि जॅकेट वाला बाबा ही भाषा माजी मुख्यमंत्री याच्या तोंडी शोभत नाही, असं रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे खाण्याचे आणि दाखवायचे दात वेगळे हे आता महाराष्ट्र ओळखतो असंही कदम यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा, की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा चालवता, असं आव्हान रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.
उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या उद्धव ठाकरेंनी भगव्या झेंड्याला डाग लावण्याचे काम केले त्या उद्धव ठाकरेंना कोकणात एकही जागा मिळणार नाही, त्यांना बसायला एकही जागा मिळणार नाही, असं रामदास कदम म्हणाले.
शरद पवार यांचं भावनिक राजकारण चालणार नाही : रामदास कदम
रामदास कदम यांनी शरद पवार यांनी निवृत्तीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. शरद पवार यांच्यावर बोलाण्याइतका मी मोठा नाही. पण, लोकांना भावनेत कसं गुंडाळायाच हे शरद पवार यांच्याकडून शिकावं असा खोचक टोला रामदास कदम यांनी लगावला. यापुढे निवडणुका लढवणार नाही हे शरद पवार यांचं वक्तव्य लोकांना भावनिक करणारं आहे, असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
आता लोकं भावनिक होणार नाहीत. ये पब्लिक है, सब जानती है, असंही ते म्हणाले.शरद पवार यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या सूचक विधानावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली.
इतर बातम्या :