यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. यवतमाळ, वणी, राळेगाव, अर्णी, उमरखेड, पुसद आणि दिग्रस या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी राळेगाव मतदारसंघा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात भाजपनं पुन्हा एकदा अशोक उईके यांना पुन्हा संधी दिली आहे. तर, काँग्रेसनं माजी मंत्री वसंत पुरके यांना संधी दिली आहे. मनसेनं या मतदारसंघातून अशोक मेश्राम यांना उमेदवारी दिलेली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीकडून किरण कुमारे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. 


राळेगाव विधानसभा मतदारसंघात अशोक उईके आणि वसंत पुरके यांच्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील लढत झाली होती. राळेगाव मतदारसंघातून त्यावेळी अशोक उईके यांनी वसंत पुरके यांचा पराभव केला होता. अशोक उईके यांना 90283 मतं मिळालेली. तर, वसंत पुरके यांना 80948 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या माधव कोहळे यांनी घेतलेली मतं देखील लक्षणीय होती. वंचितच्या माधव कोहळे यांना 10705 मतं मिळाली होती. 


वसंत पुरके अन् अशोक उईके पुन्हा आमने सामने


वसंत पुरके आणि अशोक उईके राळेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वसंत पुरके आणि अशोक इईके यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.


लोकसभा निवडणुकीत काय घडलेलं?  


यवतमाळ जिल्ह्यातील 7 मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघात विभागलेले आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात महायुतीमधून शिवसेनेच्या राजश्री पाटील लोकसभा निवडणूक लढवत होत्या. तर, महाविकास आघाडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख रिंगणात होते. राजश्री पाटील यांना 75617 मतं मिळाली होती. तर, संजय देशमुख यांना 100294 मतं मिळाली होती. 


लोकसभेला मतदारांचा कौल मविआकडे 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातून  भाजपचे 5 आमदार निवडून आले होते. तर, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून आला होता. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान केल्याचं पाहायला मिळालं.  महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिमचे उमेदवार संजय देशमुख यांना, चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि हिंगोलीचे ठाकरेंच्या सेनेचे नागेश आष्टीकर यांना आघाडी मिळाली होती. एकमेव पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईक यांनी महायुतीच्या राजश्री पाटील यांना आघाडी दिली होती. 


इतर बातम्या : 


यवतमाळमध्ये 2019 ला भाजप सेनेचं वर्चस्व, 2024 च्या लोकसभेला मविआची सरशी, विधानसभा निवडणुकीत काय होणार?