पुणे: चिंचवडमध्ये अजित पवारांचे समर्थक नाना काटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीचा फटका महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाला नक्कीच बसणार आहे. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः नाना काटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले. थेट अजित पवारांकडून काटे यांना समजवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या बैठकीनंतर नाना काटे माघार घेणार की बंडखोरीवर ठाम राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुतीतील मित्रपक्षातील भाजपकडून शंकर जगताप आणि शरद पवार गटाकडून राहुल कलाटे मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात काटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. पण दादांच्या मनधरणी नंतर ते काय भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाना काटे अपक्ष लढणार
महायुतीकडून चिंचवडची जागा भाजपला सुटली, भाजपने शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना शेवटी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. त्यामुळे महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या पक्षांकडून राहुल कलाटेंना उमेदवारी
चिंचवडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत तिघांना एकमत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या होत्या. मात्र, चिंचवडमधून राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.
चिंचवडमध्ये चौरंगी लढत
चिंचवडमध्ये चौरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी देखील अपक्ष अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी असल्याने चौरंगी लढत दिसत आहे. मात्र, अजित पवारांनी नाना काटेंची भेट घेऊन समजूत घातल्यामुळे नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.