मुंबई  : आरक्षणवादी आघाडीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील या येणाऱ्या विधानसभेत इतके उमेदवार उभे करणार होते.इथं याला पाडणार, त्याला पाडणार, या सगळ्या गप्पा टीव्हीवर बघत होतो, कायम तारखा बदलायचे आता या तारखेला जाहीर करणार, त्या तारखेला जाहीर करणार,आता 28 गेली, 29 गेली, आता फॉर्म भरायची तारीख निघून गेली, 3 तारखेला निर्णय जाहीर करणार असं सांगत आहेत, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.


प्रकाश शेंडगे पुढं म्हणाले, आम्ही त्याच वेळी सांगत होतो एकट्या मराठा समाजावर निवडणूक कुणालाही जिंकता येत नाही, आता त्यांना उशिरा सूचलेले शहाणपण आहे.. जरांगे चौथी शिकलेले आहेत त्यांना राजकारणाचा काय अनुभव असू शकेल?त्यांच्या सल्लागारांनी हा सल्ला उशिरा दिला की मुस्लीम समाज सोबत घ्यावा लागेल, इतर समाजाला सोबत घ्यावं लागेल, असं शेंडगे म्हणाले. नोमानी साहेब आहेत त्यांना सोबत घेतलं, आंबेडकरी समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न आहे, आनंदराज आंबेडकर त्यांच्या सोबत दिसले, असंही त्यांनी म्हटलं. 


जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत : प्रकाश शेंडगे


आता निवडणुका लागलेल्या आहेत, जरांगे उमेदवार उभे करु शकत नाहीत, एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, धर्मगुरु नोमानी कोण आहेत, त्यांना यापूर्वी कधी सामाजिक आणि राजकीय चळवळीत पाहिलं नाही, मुस्लीम आरक्षणाविषयी कधीही वाच्यता त्यांनी केलेली पाहिलं नाही. सच्चर कमिटीच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी भूमिका घेतलेलं पाहिलं नाही, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं.  


शरद पवारांचे उमेदवार असताना त्यांना सज्जाद नोमानी यांनी पाठिंबा दिल्याचं ऐकलं होतं. नोमानी यांना मनोज जरांगे यांच्याकडे कुणी पाठवलं हे स्पष्ट झालंय, असंही शेंडगे म्हणाले. 


एका दिवसात काय घडलं ज्यामुळं आनंदराज आंबेडकर यांना मनोज जरांगे यांच्यासोबत जावं लागलं.कुठल्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला घेऊ नये, अशी भूमिका आनंदराज आंबेडकर यांची होती , आता ती त्यांनी बदलली काय असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. 


दलित समाज मनोज जरांगे यांच्यासोबत जाणार नाही, असं आम्हाला वाटतं. ओबीसींपासून दलितांना कधीही वेगळं काढता येणार नाही.  10 ते 12 मुस्लीम उमेदवार आमच्यासोबत घेतलं आहे. महायुती आणि मविआ मुस्लीम आरक्षणाबाबत बोलत नाही.मुस्लीम आरक्षण हायकोर्टानं निर्णय देऊनही का दिलं गेलं नाही. निवडणूक आली की मुस्लीम समाजाची मराठा समाजाला आठवण झाली, असा सवाल देखील प्रकाश शेंडगेंनी उपस्थित केला आहे. 


ओबीसी प्रवर्गात कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ओबीसी आरक्षण, दलित आरक्षण, मुस्लीम आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी यासाठी आरक्षणवादी आघाडी स्थापन केलेली आहे. पूर्ण ताकदीनं लढणार आहे. आनंदराज आंबेडकर यांची भूमिका मराठाधार्जिणी असता कामा नये. तुमच्यासाठी आमची दारं उघडी आहेत. काय घडलं ते माहिती नाही, आनंदराज आंबेडकर यांना भूमिका का बदलावी लागली, असा सवाल देखील प्रकाश शेंडगे यांनी केला. या निवडणुकीत ओबीसी, दलित मुस्लीम एकत्र आलेला आहे, असंही ते म्हणाले. 


इतर बातम्या : 


मनोज जरागेंच्या रुपाने भारताला आधुनिक गांधी-आंबेडकर आणि मौलाना आझाद मिळतील : मौलाना सज्जाद नोमानी


शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार