Parner Assembly constituency 2024 : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणची लढत सर्वाधिक गाजली. पारनेर विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके यांनी तुतारी हाती घेत सुजय विखेंविरोधात दंड थोपटले. राज्याचे लक्ष लागलेल्या या लढतीत निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या साम्राज्याला हादरा देत दिल्लीचे तिकीट मिळवले. लोकसभेतील या विजयानंतर आता रिक्त झालेल्या पारनेर विधानसभेतही निलेश लंके पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी ते त्यांच्य पत्नी राणी लंके यांना उतरवणार असल्याचेही बोलले जात आहे. 


पारनेर विधानसभा मतदार संघामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत झाली होती. या निवडणुकीतही निलेश लंके यांनी बाजी मारली होती. निलेश लंके यांनी या निवडणुकीत तब्बल तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव करत किंगमेंकर ठरले होते. यावेळी निलेश लंके 1,39,963 मतांनी विजयी झाले होते, तर शिवसेनेचे विजय औटी यांचा ५९, 838 मतांनी पराभव झाला होता. त्याआधी 2014च्या निवडणुकीत  शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी विजयाची हॅट्रिक केली होती. त्यांचा 73,263 मतांनी विजय झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित झावरे यांचा 27,422 मतांनी पराभव झाला होता. 


दरम्यान, सध्या होणाऱ्या विधानसभेला निलेश लंके यांनी त्यांच्या पत्नी राणी लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाला विरोधही होताना दिसत आहे. पारनेरमध्ये निलेश लंके यांना घेरण्यासाठी कधी काळी त्यांचे निकटवर्ती असलेले पारनेर नगरपालिकेचे  माजी नागराध्यक्ष विजय औटी यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच विधानसभा लढवण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश लंकेंना रोखण्यासाठी महाविकास आघाडी काय डाव टाकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.