Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचा मतदार संघ म्हणजे संगमनेर विधानसभा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मतदार संघात एकहाती वर्चस्व राहिले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभेचे नेतृत्व करत आहेत, त्यामुळे याठिकाणी थोरात म्हणतील तीच पूर्व दिशा असे राजकारण रंगते. मात्र यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी याठिकाणी लक्ष घातल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. 


दक्षिण नगरच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता सुजय विखे पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. विधानसभेसाठी त्यांनी पारंपरिक राजकीय शत्रू असलेल्या थोरातांच्या विरोधातच दंड थोपटण्याचे संकेत स्वत: सुजय विखेंनी दिले आहेत. मात्र भाजपने अद्याप सुजय विखेंना उमेदवारी मिळण्याबाबत संकेत दिले नाहीत. त्यामुळे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना रंगणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


परंतु संमनेरमध्ये थोरातांशी सामना करण्याचे आव्हान निश्चितच सोपे नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून 1985 पासून 2019 पर्यंत असे सलग आठ वेळा निवडून आले आहेत.  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 25 हजार 380 हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना 63128 मते मिळाली होती. 


दुसरीकडे सध्या संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात मैदानात उतरणार असल्याचेही बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी संगमनेर शहरात भव्य महिला मेळावा पार पडला होता. त्यामुळे जर जयश्री थोरात मैदानात उतरल्या तर थोरात - विखे घराण्याची दुसरी पीढी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये विखे-थोरातांमध्ये सामना रंगणार का? याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.