Maharashtra Vidhansabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात (Shrivardhan Assembly Constituency) देखील राजकीय वातावरण तापलं. रायगडमधील राजकारणातील सर्वात मोठं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सुनील तटकरे. 


खरंतर श्रीवर्धन हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र 2009 साली सुनील तटकरेंनी इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 2014 ला अवधूत तटकरे निवडून आले. तर 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे ( NCP Aditi Tatkare) यांनी बाजी मारली. त्यामुळे सध्या तरी श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. 2019 मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला होता. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद रामचंद्र घोसाळकर यांचा 39621 मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला. 2024 च्या निवडणुकीत महायुतीकडून आदिती तटकरे यांना पुन्हा संधी देण्यात येईल. तर यावेळी महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल. 


श्रीवर्धन मतदारसंघातील समस्या-


ग्रामीण भारतातील रोजगाराचा प्रश्न, पिण्याचं पाणी, बेरोजगारी हे या भागातले मोठे प्रश्न आहेत. ऐतिहासिक वास्तू आणि इतर पर्यटन स्थळांकडे आजपर्यंत दुर्लक्षच केलं गेलं. पर्यटनाच्या चांगल्या सोयी केल्यास स्थानिकांना चांगला रोजगार मिळू शकतो.


महिलांना उमेदवारी देण्याचा शेकापने पाडला पायंडा-


रायगडमधील 1952 सालापासून निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिलेली नाही. अपवाद फक्त शेकापच्या मीनाक्षी पाटील यांचा आहे. शेकापने त्यांना 1995, 1999 आणि 2009 साली उमेदवारी दिली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पेलत विजयश्री खेचून आणली होती. महिला उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्याचा खरा पायंडा हा शेकापने पाडला आहे. हा राजकीय इतिहास कोणालाच विसरून चालणार नाही. त्या पाठोपाठ आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव जोडले गेले आहे.


श्रीवर्धनचा इतिहास-


रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्त्वाचे बंदर होते. सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते. बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते. श्रीवर्धनचा तीन किमीचा लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो. तसेच अनेक ऐतिहासिक, जुन्या मंदिरांसाठीही हा परिसर ओळखला जातो.


संबंधित बातमी:


रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती