मुंबई: सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. कोटेचा यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एस. चोक्कलिंगम यांना तीन अज्ञात लोकांकडून त्यांच्या सुरक्षेचा भंग करण्याचा आणि त्यांच्या जीवाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पत्र लिहिले आहे. यामागे आपले विरोधक असल्याचे सांगत कोटेचा यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.
सुरक्षेचा भंग करून जीवाला हानी करण्याचा तीन अज्ञात व्यक्तींनी केला असून असे कृत्य आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आणि आपला जीव धोक्यात घालणारे असल्याचे सांगून कोटेचा यांनी या तिघांवर कठोर कारवाई आणि तपास करून त्यांचे हेतू जाणून घेण्याची मागणी केली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी दिवसाचा प्रचार संपल्यानंतर मुलुंड (पश्चिम) येथील एका हॉटेलमध्ये त्यांच्या टीम मेंबर सोबत जेवत असताना घडलेली घटना नमूद केली. हे पत्र वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पाठविले आहे.
याबाबत सांगताना कोटेचा म्हणाले की पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर या कारमध्ये तीन संशयास्पद व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी माझ्या सुरक्षा पथकाला सांगितले की मी त्यांना फोन करून भेटायला बोलावले आहे. माझ्या सुरक्षा रक्षकांनी चौकशी केली तेव्हा त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव नितीन भाई असे सांगितले. मात्र, मी कोणालाही फोन केलेला नव्हता. तेच मी माझ्या सुरक्षा रक्षकाना सांगितले. पण माझा ठावठिकाणा त्यांना कसा कळला या विचाराने मला धक्का बसला, असे कोटेचा म्हणाले.
ईशान्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या कोटेचा यांनी पुढे सांगितले की, लोकसभेच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. माझ्या बॅक ऑफिसवरही हल्ला करण्यात आला. दोनपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आले. मला स्पष्टपणे संशय आहे की माझे विरोधक पुन्हा एकदा माझ्या जीवाचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वाईट हेतूने माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, असे कोटेचा पुढे म्हणाले.
इतर बातम्या :
शिवाजीराव सावंतांची भूमिका गुलदसत्यातचं! माढ्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? घडामोडींना वेग