पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस 
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवली असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी काल(शुक्रवारी म्हटलं) आहे. त्या नोटिसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टिंगरेंना टोला लगावला.  ज्या शरद पवार साहेबांनी मागील निवडणुकीकरता एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच आज पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे, असं सुळेंनी म्हटलं, त्यावरती मी नोटीस पाठवली नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरेंनी पोर्शे अपघात प्रकरणात त्यांच्यावर टिका करु नये यासाठी शरद पवारांना नोटीस बजावल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी काल (शुक्रवारी) प्रचार सभेत केला. मात्र, त्यावर आमदार सुनिल टिंगरे यांनी आपण शरद पवारांना अशी कोणतीही नोटीस बजावली नसल्याचा दावा केला आहे. आपण महाविकास आघाडीतील पक्षांना आपल्यावर होत असलेल्या टिकेबद्दल एक कॉमन नोटीस बजावली होती. मात्र, शरद पवार किंवा कोणत्या नेत्याला आपण नोटीस बजावली नव्हती असं आमदार टिंगरे म्हणालेत. शरद पवार आजही आपले दैवत आहेत असंही आमदार सुनिल टिंगरेंनी म्हटलं आहे.


"पवार साहेबांना वैयक्तिक मी कोणतीही नोटीस बजावली नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जी चुकीची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे अनेक नेते आणि प्रवक्ते यांच्याकडून काही वक्तव्य करण्यात आली. माझी बदनामी झाली तर आता मी या विधानसभेचा उमेदवार म्हणून आता इलेक्शन मध्ये ते पुन्हा एकदा कोणत्याही व्यक्तीकडून चुकीची माहितीच्या आधारे कोणती वक्तव्ये होऊ नये अशा पद्धतीची त्यांना नोटीस दिलेली आहे.


शरद पवारांना वैयक्तिक तुम्ही नोटीस दिली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांना एक कॉमन नोटीस दिलेली आहे. एक भाग आहे की, ती नोटीस अनेक नेत्यांना मिळाली असेल. महाविकास आघाडीच्या त्यामध्ये शरद पवारांचा देखील समावेश आहे. नोटीस पक्षाला दिलेली आहे. आजही शरद पवार माझे दैवत आहेत, ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत, असंही टिंगरेंनी म्हटलं आहे.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?


काल सुप्रिया सुळेंनी प्रचारसभेवेळी म्हटलं, वडगाव येथील आमदाराने (सुनील टिंगरे) शरद पवारांना नोटीस पाठवली. पोर्शे कार अपघात प्रकरणात माझी बदनामी कराल तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन, असं त्या नोटिसमध्ये लिहिलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या 80 वर्षाच्या योद्ध्याबद्दल ते (सुनील टिंगरे) आपल्या भाषणात यापूर्वीच्या निवडणुकीत बोलत होते. ज्यांनी त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली होती, ज्यांच्यामुळे ते निवडून आले, त्याच शरद पवारांना तुम्ही पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर नोटीस पाठवली होती. माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन असं म्हणत नोटीस बजावली, असं सुप्रिया सुळेंनी काल म्हटलं होतं.