मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार नाही अशा चर्चा होत्या. मात्र, काही वेळातच शिवसेनेची पहिली यादी आली. या यादीत माहीममधून आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली. दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं अमित ठाकरेंपुढं आता दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे.
अमित ठाकरे यांनी एबीपी माझाच्या 'ताणे बाणे' या विशेष कार्यक्रमात या सर्व घटनाक्रमावर भाष्य केलं. माझ्या वडिलांनी त्यांच्या मुलासाठी सभा घेतली होती. त्यामुळं माणूस म्हणून अपेक्षा होती परतफेड होईल. मात्र, जेव्हा त्यांनी आमदार उमेदवार दिला तेव्हा मला आवडलं कारण मला एकटं लढून निवडून यायचं नव्हतं. मी साहेबांना म्हटलं होतं की मी उभा राहतोय त्यासाठी दहा जागांवर तडजोड करायची नाही, असं सांगितलं होतं, असं अमित ठाकरेंनी म्हटलं. तिकडून उमेदवार देणार नाही अशा चर्चा होत्या पण तिकडून उमेदवार दिला, हे त्यांचं राजकरण आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
माहीमची तिरंगी लढत
माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अमित ठाकरेंच्या रुपानं दुसरे ठाकरे मतदारांसमोर
अमित ठाकरे यावेळी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी निवडणूक लढवली होती. आता आदित्य ठाकरे दुसऱ्या टर्मसाठी वरळीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर मनसेच्या संदीप देशपांडे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकला चलोची भूमिका घेत कोणत्याही राजकीय पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत युती न करण्याची भूमिका घेतली होती.
मनसेकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर
मनसेनं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. मनसेच्या चौथ्या यादीत 5 उमेदवारांचा समावेश आहे. मनसेनं आतापर्यंत 70 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
इतर बातम्या :