Mahayuti Seat Sharing नवी दिल्ली : महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी महायुतीचे नेते राजधानी नवी दिल्लीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपावर राजधानी दिल्लीत एक तासापासून बैठक सुरूचआहे.बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित आहेत. महायुतीमधील जागा वाटपांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीतील घटकपक्ष जागांची अदलाबदल केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजप काही जागा राष्ट्रवादीला सोडणार तसंच एकनाथ शिंदे देखील 2019 ला शिवसेनेने लढलेल्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.
महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार?
आत्तापर्यंत महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांकडून182 जागांची घोषणा करण्यात आलेली आहे. उर्वरीत 106 जागांपैकी 22 जागांवर वाद कायम होता. त्यापैकी काही जागांवर तोडगा निघू शकतो अशी माहिती आहे. महायुतीत 7-8 जागांवर तिढा कायम राहण्याची शक्यता आहे.
महायुती मधील राजकीय पक्ष एकत्रित सभा घेणार
महायुतीमधील तीन राजकीय पक्षांमध्ये समन्वय असल्याचं जनतेला दाखवण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित सभा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रचार यंत्रणेत महायुतींच्या नेत्यांचा समावेश आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या वतीने एकत्रित जाहीरनामा करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती एकसंध आहे हेच चित्र दिसले पाहिजे यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. महायुतीचे तीन प्रमुख नेते एकत्रितपणे उमेदवारांसाठी प्रचारात सहभाग घेणार आहेत.
महायुतीमधील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांनी भर द्यावा, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्या आहेत. 'नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढा', असं शाह यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. 'राज्यात महायुतीच सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, त्यासाठी मतांची विभागणी यासाठी बंडखोरी रोखा' अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. 'बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा', 'बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावं' अशा सूचना देखील अमित शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपनं आतापर्यंत 99, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 45 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 38 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
इतर बातम्या :