Shivadi Assembly constituency : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अखरे शिवडीचा उमेदवार जाहीर केलाय. विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं आहे. शिवडी मतदारसंघाचा वाद उद्धव ठाकरेंच्या कोर्टात म्हणजेच मातोश्रीवर गेला होता. गेल्या काही दिवसांपासून शिवडीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडली. यातूनच आज उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांना जाहीर केली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून शिवडी विधानसभेबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत पेच सुरु होता. विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यामध्ये शिवडीची जागा मिळवण्यासाठी रस्सीखेंच सुरु होती. त्यानंतर आज (दि.24) शिवडी विधानसभेचे शाखाप्रमुख मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधून शिवडी विधानसभेचा निर्णय आज जाहीर केला आहे. 


उद्धव ठाकरे शिवडीच्या उमेदवारीबाबत काय बोलले? 


संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देत आहोत, असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, यानंतर शिवडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी नवस बोललेले सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला त्यानंतर ते बाहेर पडले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर सुधीर साळवी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी संघटनेशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सुधीर साळवी म्हणाले आहेत. 


सुधीर साळवींच्या उमेदवारीसाठी सिद्धिविनायकाला साकडं घातलं होतं 


शिवडी विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार अजय चौधरी हेच असतील हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, शिवडी विधानसभेसाठी सुधीर साळवींच्या समर्थकांनी सिद्धिविनायकाच्या चरणी चिठ्ठी अर्पण करून साकडं घातलं होतं. लालबागच्या राजाच्या चरणीही अशीच एक चिठ्ठी अर्पण केली होती. मात्र, बाप्पा अजय चौधरी यांच्या पाठीशी राहिल्याचे चित्र आहे. कारण सुधीर साळवींना उमेदवारी मिळालीच नाही.


अजय चौधरींना एकनिष्ठतेचं फळ


एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली होती. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अजय चौधरी यांनाच संधी दिली असल्याचे बोलले जात आहे. 





इतर महत्त्वाच्या बातम्या 


Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश