परभणी : परभणी जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रासपचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका मधुसूदन केंद्रे यांनी घेतली आहे.  मला पक्षात ठेवा न ठेवा मी या राक्षसाचे काम करणार नाही, असं केंद्रे यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गंगाखेडचे उमेदवार विशाल कदम यांना पाठिंबा जाहीर केला. 


अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  धनंजय मुंडे यांचे मेहुणे  माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत रत्नाकर गुट्टेंवर हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव देखील उपस्थित होते.  


महायुतीनं चोराला पाठिंबा दिला


मला पक्षात ठेवा अथवा ठेवू नका मी या राक्षसाचे काम करणार नाही, असं वक्तव्य मधुसूदन केंद्रे यांनी केलं.  महायुतीच्या लोकांनी चोराला पाठिंबा दिलाय, त्याचा नायनाट केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा हल्लाबोल  माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे यांनी महायुतीने पाठिंबा दिलेल्या रासपचे उमेदवार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्यावर केला आहे. 


डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी गंगाखेड मध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आपली घुसमट व्यक्त केली. यावेळी केंद्रे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल कदम यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या मेळाव्याला  ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव  उपस्थित होते. खासदार जाधव यांनी रत्नाकर गुट्टे आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.केंद्रे यांनी उघडपणे घेतलेल्या भूमिकेमुळे रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 


आपल्या शेतकऱ्याचे पैसे हाणले, त्या पैशांच्या जोरावर राजकारण करुन लोकांना विकत घ्यायची मानसिकता त्यांनी ठेवली आहे, असं संजय जाधव म्हणाले. आज साडे चार हजार कोटी रुपये कर्ज शेतकऱ्यांच्या नावानं काढून ते बुडवण्याचं काम रत्नाकर गुट्टे यांनी केल्याचा आरोप संजय जाधव यांनी केले. पैसे घ्या मतदान करताना मशालीला करा, असं संजय जाधव म्हणाले. गंगाखेडमध्ये डॉ. मधुसूदन केंद्रे आल्यानं ते काही करु शकणार नाहीत. तुम्हाला संकटात सोडून पळ काढण्याचं काम कधी करणार नाही, असं संजय जाधव म्हणाले.    



भाजपनं मित्र पक्षांसाठी चार जागा सोडल्या होत्या. त्यापैकी गंगाखडेची जागा भाजपच्या कोट्यातून रासपला सोडण्यात आली होती.  रासप महायुतीतून बाहेर पडल्यानंतरही त्यांना एक जागा सोडण्यात आली होती. 



इतर बातम्या : 


Nagpur Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेची खडाजंगी, कोण-कोण भिडणार? 12 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!


Dhule Assembly Election : धुळे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कुणाची बाजी? 5 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!