Bhau Kadam on Ajit Pawar and Sharad Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. छोटे-मोठे सर्वच नेते प्रचार आणि रॅलीमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. राजकीय नेत्यांसोबत सेलिब्रिटीदेखील प्रचारात उतरले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता आणखी प्रसिद्ध कॉमेडीयन भाऊ कदम हा देखील अजित पवारांच्या प्रचारात उतरला आहे.
भाऊ कदम करणार अजित पवारांचा प्रचार
अभिनेता आणि कॉमेडीयन भाऊ कदम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहे. याबाबत एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भाऊ कदमने अजित पवारांचं कौतुक केलं. अजित पवार मुख्यमनंत्री व्हावे, अशी इच्छादेखील भाऊ कदमने बोलून दाखवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीबद्दल प्रतिक्रिया देताना भाऊ म्हणाला की, शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायला हवेत, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली.
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
भाऊ कदम यावेळी म्हणाला की, "अजित पवारांनी लाडकी बहीण योजना आणली. प्रचंड मेहनत करणारा नेता आहे, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मी अजित पवारांना भेटलो ते मला विचारात होते, हवा येऊ द्या का बंद झालं. त्यांना तो कार्यक्रम खूप आवडायचा. स्ट्रेसमधे असलो की, मी कार्यक्रम पाहायचो असं सांगत होते. मी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, मी केवळ स्टार प्रचारक म्हणून काम करेल. मी राजकारण करत बसलो. तर सगळी कामं बाजूला राहतील", असंही यावेळी भाऊ कदमने सांगितलं आहे.
'शरद पवार-अजित पवार एकत्र यायला हवेत'
भाऊ पुढे म्हणाला की, पवार कुटुंबात काय झालं माहिती नाही, मात्र मला वाटतं शरद पवार अजित पवार एकत्र यायला हवेत. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, असं वाटतं. एकच वादा अजित दादा. गद्दारीबाबत बोलणार नाही. त्यातील नेमकी माहिती मला नाही. शरद पवारांची माझी बारामतीत एका नाटकाच्या प्रयोगा दरम्यान भेट झाली. त्यावेळी शरद पवारांनी एका नाटकात काम केलं होतं, तो फोटो मला त्यांनी दाखवला, अशी आठवण भाऊ कदमने सांगितली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :