Hadapsar Assembly constituency : हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि सर्वांचं लक्ष्य केंद्रीत असलेला मतदारसंघ आहे. हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे चेतन विठ्ठल तुपे हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने यावेळीही चेतन तुपे यांना उमेदवारी दिली होती. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे आमदार चेतन तुपे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत झाली. या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदाराने संधी मिळवली आहे.


हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर यांना पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तुपे यांनी 7122 मतांनी विजयी आघाडी घेत मतदारसंघात पुन्हा विजय मिळवला आहे. 


हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते. शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्यातील थेट लढतीने या मतदारसंघाकडे राज्यभराचे लक्ष वेधले होते. मनसेचे साईनाथ बाबर यांची उपस्थितीही लक्षणीय होती. मात्र या मतदारसंघातील इतिहास रचत सलग दुसऱ्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पाडली आहे.


हडपसर मतदारसंघाचा इतिहास


हडपसर विधानसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून येथे तीन निवडणुका झाल्या आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी येथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला. 2009 मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना उमेदवार म्हणून उभे केले. टिळेकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन विट्ठल तुपे यांना विजय मिळवला. 


हडपसरची जनता दरवेळी देते वेगळ्या पक्षाला संधी

2019: चेतन विठ्ठल तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस
2014: योगेश टिळेकर, भारतीय जनता पार्टी
2009: महादेव बाबर, शिवसेना


2019 चा निकाल


2019 मध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तर शिवसेना-भाजप युतीकडून योगेश टिळेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चेतन विठ्ठल तुपे यांना 92 हजार 326 तर योगेश टिळेकर यांना 89 हजार 506 एवढी मते मिळाली होती. या निवडणुकीत केवळ 2 हजार 820 च्या फरकाने चेतन तुपे निवडून आले होते.