बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभरात जोरदार प्रचार केला जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतील चार गावांच्या दौऱ्यावर असून पानसरेवाडी येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एक कार्यकर्ता अजित पवारांना म्हणाला की, काकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांनी असलं प्रेम मला नको, असे उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
अजित पवार म्हणाले की, घरातील दोन उमेदवार उभे राहिले आहेत. लोकसभेला जो निकाल दिला त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. ठेकेदारने खराब काम केलं तर दोष मलाच मिळतो. महिलांना आधी पुरुष मंडळी पैसे द्यायचे आणि हिशेब मागायचे. आता हिशेब द्यायची गरज नाही. आजपर्यंत तुम्ही नेहमी साथ दिली. तुम्ही लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जम्मत होईल, असे मिश्कील वक्तव्य अजित पवार यांनी केले.
प्रतिभा काकींना नातवाचा पुळका का?
ते पुढे म्हणाले की, साहेब म्हणाले मी रिटायर होणार आहे. त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे हे तुम्हाला माहित आहे. भावनिक होऊ नका. साहेबांचा फोटो लावला आहे. साहेबांची ही निवडणूक नाही ना? कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती? मी काय खतांडा पिताडा आहे का? मी बारामती तालुक्याची वाट लावली का? मी टीका करायला गेलो तर तो आहे माझा पुतण्या. मी टीका करायला गेलो की घरातल्या घरात कसे काढायचं? परत असं केलं तर नाभिक समाज नाराज होईल. मी निवडणूक झाल्यावर काकींना विचारणार आहे की, एवढा पुळका का होता? काल महिलांना 500 रुपये आणून बसवले. त्यांना चहा नाही पाणी नाही, ही बारामतीची पद्धत नाही. काम करण्यासाठी नेतृत्वात धमक असावी लागते, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा
लोकसभेला बरेच लोक म्हणायचे की, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा आता कमी दिवस राहिले आहेत. या गावात सुनेत्राला 30 टक्के मते आणि सुप्रियाला 60 टक्के मते होती. यावेळेस चांगल्या पद्धतीने मतदान करावं ही विनंती आहे. पानसरेवाडीतील लोकांना जाऊन नमस्कार करावा म्हणून मी आलोय. मी ज्यांना पदे दिली तेच माझ्या विरोधात गेले, असेही अजित पवार यांनी म्हटले.
असलं प्रेम मला नको
तरुणांनो मला यावेळी साथ द्या, मी तुम्हाला संधी देतो. बारामतीत अनेक निवडणुका लढवल्या पण चुकीचे पायंडे बारामतीत पडत आहेत. गाफील राहू नका. काही जण सांगतात मागे सुप्रियाला दिले आता दादांना मत देणार आहे. तुलना करू नाही पण, साहेबांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त कामे झाली, असं देखील म्हटलं जातं. साहेबांसोबत तुलना होते, त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होते. आता काकी इकडे फिरत आहेत. काकी असं म्हणत असतील की, साहेबांना, दादांना भरभरून प्रेम दिलंय, एकदा बघून तरी याव नेमकं केलंय त्यांनी. अजित पवारांनी असे म्हणताच एक कार्यकर्ता अजित दादांना म्हणाला की, काकींना मी सांगिलते, काकी दादाला त्रास देऊ नका. त्यावरती काकी हसल्या, कार्यकर्ता पुढे म्हणाला, काकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, अजितदादा म्हणाले, असलं प्रेम मला नको. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला होता.
आणखी वाचा