छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार दिले आहेत. असे असतानाच आता एमआयएम या पक्षानेही या विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. एमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना औरंगाबाद पूर्व (Aurangabad East) या जागेवरून तिकीट मिळाले आहे. त्यामुळे जागेवर थेट तिहेरी लढत होणार आहे. 


एमआयएम पक्षाने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे सूतोवाच केले होते. आमची यादी तयार आहे, असे जलिल म्हणाले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबरच्या रात्री जलील यांना औरंगाबाद पूर्व या मतदारसंघासाठी एमआयएम पक्षाने उमेदवारी दिली. जलील यांनात तिकीट मिळाल्यानंतर या भागात जल्लोष करण्यात आला.      


औरंगाबाद पूर्वमध्ये होणार तिहेरी लढत 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ फार महत्त्वाचा आहे. या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच जलील यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेसाठी महायुतीकडून भाजपाचे नेते अतुल सावे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटलेला आहे. या जागेसाठी काँग्रेसने एम के देशमुख यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता थेट तिहेरी लढत होणार आहे.  


एमआयएमकडून मविआशी चर्चा करण्याचा प्रयत्न 


एमआयएम या पक्षाने गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. या पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी या आघाडीला अनेक पत्रं लिहिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये चर्चाही झाली. जलिल यांनी सांगितल्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एका नेत्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना प्रतिसाद दिला नाही. जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएम या पक्षाने महाविकास आघाडीला एकूण 15 जागा मागितल्या होत्या. या मागणीनंतर महाविकास आघाडी त्यांच्याशी जागावाटपावर चर्चा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीने एमआयएमला कोणताही प्रतिसाद दिला नाही.


आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार


दरम्यान, जलील यांनी एमआयएमच्या या निवडणुकीतील भूमिकेवर 26 ऑक्टोबर रोजी भाष्य केलं होतं. आता सगळं संपलं आहे. आमची यादी तयार आहे. आम्ही आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे जलिल म्हणाले होते. म्हणजेच आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने उडी घेतली असून हा पक्ष काही मोजक्या जागा स्वतंत्रपणे लढवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जलील यांना औरंगाबाद पूर्वमधून तिकीट जारी करण्यात आलं आहे.  


हेही वाचा :


Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी लोकसभा पोटनिवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील : प्रताप पाटील चिखलीकर


Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट