गेली 60 वर्षे एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदा नवा इतिहास घडणार असून गेली 55 वर्षे आमदार असलेल्या गणपतराव देशमुख यांनी यावेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा शेकाप बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी युतीने कंबर कसली आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सांगोला विधानसभा निवडणुकीत जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची राज्यभर परमनन्ट आमदार म्हणून ओळख आहे. विधीमंडळातील भीष्माचार्य असलेले गणपतराव देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीमुळे अनेक रेकॉर्ड बनविले आहेत.


अतिशय चांगली स्मरणशक्ती, कार्यकर्त्यांच्या वस्तीपर्यंत थेट संपर्क अभ्यासू आणि अजातशत्रू असलेल्या गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ 2 पराभव पहिले. यातील पहिल्या पराभवानंतर लगेचच झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा गणपतराव देशमुख यांनी विजय मिळविला होता. यानंतर 1995 मध्ये त्यांचे कायमचे प्रतिस्पर्धी शहाजीबापू पाटील यांच्याकडून अतिशय निसटत्या मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यापूर्वी आणि नंतर मात्र त्यांनी गेली 55 वर्ष आपली आमदारकी कायम ठेवली. आज वयाच्या 93 व्या वर्षीही कायम पाण्यासाठी आंदोलनात सहभागी होणारे गणपतराव यांनी आपल्या कारकिर्दीत कायम दुष्काळी असलेल्या सांगोल्याचा पाणीप्रश्न सोडवला आहे. पाण्यासाठी संघर्ष हीच त्यांची प्रत्येक निवडणुकीतील टॅग लाईन राहिली होती.


गणपतराव देशमुख नाही मग कोण?


यावेळी गणपतराव देशमुख निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांना चार पिढ्यापासून मतदान करणाऱ्या मतदारांपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आज गणपतराव यांची जागा घेणारे नेतृत्वच शेकापमध्ये तयार झाले नसल्याने आता कोण? हा प्रश्न खुद्द गणपतराव देशमुख यांनाही पडला आहे. धनगर समाजाचे वर्चस्व असलेल्या सांगोला मतदारसंघात गणपतरावांनंतर त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा शेकाप कार्यकर्त्यात आहे. निवडणुकीला लागणार निधी प्रत्येक वेळी राज्यभरातील धनगर समाजाकडून पुरवला जात असे हे एक उघड गुपित होते. आता गणपतराव नंतर इतर कोणत्या शेकाप उमेदवाराला, असा निधी मिळणे तसे अवघड आहे. त्यांचेच पुत्र चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिल्यास याहीवेळी निवडणूक निधी उभे राहणे सोपे होईल अशी शेकापमधील नेत्यांची मानसिकता बनली आहे. अतिशय मजबूत संघटन, वाड्या-वस्त्यापर्यंत पोचलेले कार्यकर्त्याचे मजबूत जाळे, सर्व सत्तास्थानावर मजबूत पकड असल्याने येथे शेकापचा लाल झेंडा कायमच फडकत राहिला आहे. यातूनच यंदा गणपतराव देशमुख यांच्याशिवाय दुसरा शेकाप उमेदवार हा किल्ला अबाधित राखेल, असा शेकाप कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो आहे.


वर्षानुवर्षे गणपतरावांकडून पराभूत होऊन एकदा विजयाची माळ गळ्यात पडलेले शहाजीबापू पाटील यांना यंदा पराभवाची श्रुंखला तोडण्याची संधी चालून आली आहे. जसा गणपतरावांचा विजय होण्यात विक्रम आहे, तसा माझा पराभूत होण्यातही विक्रम असल्याचे खुद्द शहाजीबापू पाटील दिलदारपणे नेहमी सांगतात. गेल्यावेळी शिवसेनेकडून लढताना पाटील यांनी चांगली लढत देऊनही त्यांचा पराभव झाला होता. यंदा मात्र गेली पाच वर्षे पाटील यांनी पूर्णवेळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक साधत भाजप उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मराठा समाजातील लोकप्रिय नेता अशी छबी असलेल्या शहाजीबापू पाटील यांची वक्तृत्वही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शहाजी पाटील यांच्यासाठी प्रत्येकवेळी त्यांचे मतदारच निधी उभा करुन त्यांचे काम करतात, ही त्यांची जमेची बाजू आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांची मताची टक्केवारी वाढत चालली असली तरी पराभव हा नेहमीचाच होता. यंदा प्रथमच समोर उमेदवार गणपतराव नसल्याने शहाजीबापू यांना विजयाची अधिक संधी समोर दिसू लागली आहे. युतीत जागा कोणालाही सुटली तरी पाटील यांची उमेदवारी निश्चित मनाली जात आहे. यातच लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीचे पाणी सांगोल्याला आणण्याच्या विषयात शहाजीबापू पाटील यांना जनतेतून खूप मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानेच गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सांगोल्यात सुरु आहे.


तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता

भाजपकडून महिला नेत्या राजश्री नागणे यांनीही उमेदवारीवर दावा करत महिलांचा महामेळावा आयोजित करून आपणही उमेदवारीसाठी दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. याशिवाय भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत देशमुख हेही एक प्रमुख दावेदार असून गेली पाच वर्षे त्यांनी सत्तेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवल्याने ग्रामीण भागात त्यांचीही मोठी लोकप्रियता शहाजीबापू पाटील यांच्या उमेदवारीच्या अडसर ठरू शकणार आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले तरुण नेते नगरसेवक चेतन केदार यांनी पक्ष प्रवेशानंतर तातडीने सभासद नोंदणी आणि गावभेट दौरे सुरु केल्याने त्यांचेही नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. याहीवेळी सत्ता येण्याची चिन्ह नसल्याने कारखाना व इतर संस्थात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही आता भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी धडपड सुरु केली आहे. काँग्रेस आघाडीमध्ये ही जागा परंपरेने शेकापसाठी सोडली जात असल्याने यंदा दीपक साळुंखे यांनाही निवडणूक लढवायची असून जर युतीकडे प्रवेश न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी साळुंखे यांनी सुरु केली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता यंदा शेकाप बालेकिल्ला धोक्यात आला असून तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यात शेकापने जर आपली परंपरागत मते राखण्यात यश मिळविल्यास पुन्हा सांगोल्यावर लाल झेंडा फडकू शकेल अन्यथा युतीकडून शहाजीबापू पाटील यांना यंदा विजयाच्या सर्वात जास्त संधी असणार हे मात्र नक्की.


विधानसभा 2014 निवडणुकीतील मतांची आकडेवारी




  • गणपतराव देशमुख (शेकाप) - 94,374

  • अॅड. शहाजीबापू पाटील (शिवसेना) - 69,150

  • देशमुख श्रीकांत (भाजप) - 14,013