परभणी : "जिंतूर" प्रचंड विस्तारलेला मतदारसंघ, एका बाजूला लोअर दुधना, दुसरीकडे येलदरी धरण, काळी कसदार जमीन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गांना जोडला गेलेला मतदारसंघ. मात्र असं असलं तरीही विकासाला हा मतदारसंघ अद्याप जोडला गेला नाही यामुळे इथल्या मतदाराला आजही आपल्या दैनंदिन गरजांसाठीच मोठा संघर्ष करावा लागतो आहे. राज्यात मोठे वलय असलेल्या रामप्रसाद बोर्डीकरांना इथल्या मतदारांनी 20 वर्ष संधी दिली. मात्र प्रश्न सुटले नसल्याने इथे 2014 च्या निवडणुकीत बोर्डीकरांना नाकारुन इथल्या मतदारांनी विजय भांबळेंच्या रुपाने तरुण आमदारास संधी दिली. यंदाही बोर्डीकर आणि भांबळे यांच्यातच इथे काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
1990 ते 2014 अशा एकूण 6 विधानसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा मतदार संघावर सलग 10-10 वर्ष दोन वेळेला रामप्रसाद बोर्डीकरांनी आपले एकहाती वर्चस्व मिळवले होते. 1999 साली झालेल्या निवडणुकीत कुंडलिक नागरे यांनी 2014 च्या निवडणुकीत विजय भांबळे हे अपवाद वगळता बोर्डीकर चार वेळेला इथे आमदार म्हणुन निवडून आले. बोर्डीकरांनी इथे साधा आपला विरोधकही निर्माण होऊ दिला नाही. मात्र अजित पवार यांच्या भक्कम पाठिंब्यावर विजय भांबळे यांनी बोर्डीकर यांच्या विरुद्ध आपले नेतृत्व सिद्ध करत जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघावर चांगलीच पकड निर्माण केली. 30 वर्षात उभ्या केलेल्या बोर्डीकरांच्या साम्राज्याला भांबळेंनी चांगलेच आव्हान दिले आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात सेलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. मात्र हे दोन तालुके मोठे विस्तारलेले असल्याने इथे एकूण 262 गाव आणि दोन शहर मिळून मतदारांची संख्या साडेतीन लाखांच्या पुढे आहे. संपुर्ण मतदार संघात मराठा, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी आणि इतर असे जातीय गणित आहेत. त्यामुळे कुठल्याही एका जातीच्या मतदानावर इथे निवडुन येण कठीण आहे. शिवाय मतदार संघातील युवक, नागरिक शिक्षण, रोजगाराच्या शोधात औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई इथेही मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. तिथे जाऊन या मतदारांना एकत्र करुन त्यांचे मेळावे घेणं ही विद्यमान आमदार विजय भांबळे असो कि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोघांनीही सुरु केले आहे. मात्र इथला तरुण किंवा मतदार या मतदार संघातून बाहेर रोजगारासाठी अथवा शिक्षणासाठी का जातोय याचा विचार मात्र कुणीही केलेला नाही त्यामुळे हि संख्या दिवसंदिवस वाढतच चालली आहे.
पहिल्यापासून जिंतूर मतदारसंघ हा आघाडीत काँग्रेस आणि युतीत शिवसेनेकडे होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत सर्वच स्वतंत्र लढले. ज्यात राष्ट्रवादीकडून विजय भांबळे,काँग्रेस कडून रामप्रसाद बोर्डीकर,शिवसेनेकडून राम खराबे तर भाजपकडून संजय साडेगावकर हे चार आणि इतर 10 अशा एकूण 14 जणांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले. ज्यात विजय भांबळे यांनी तब्बल 27358 मतांनी बोर्डीकरांचा पराभव केला होता. या निवडणुकीचं वैशिठ्य म्हणजे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या भाजपच्या उमेदवाराला तब्बल 30310 एवढी मत मिळाली तर शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असूनही इथे त्यांना केवळ 6952 मतांवर त्यांना समाधान मानावे लागले.
राज्याच्या राजकारणात वजनदार नेते असेलल्या तत्कालीन काँग्रेस कडून आमदार असताना रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिंतूर, सेलू नगरपरिषद, दोन्ही बाजार समित्या, अनेक जिल्हा परिषद सदस्य एवढंच नाही तर नवी मुंबई बाजार समिती वरही बोर्डीकरांचे वर्चस्व होते. याच नवी मुंबई बाजार समिती आणि राज्य सहकारी बँकेच्या संचालक असलेल्या रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात चांगलेच वितुष्ट होते. त्यामुळे त्यांनी बोर्डीकरांच्या या साम्राज्याला खालसा करण्यासाठी विजय भांबळे यांना चांगलीच ताकद दिली. शिवाय 2011 साली राष्ट्रवादीच्या संचालकांकडून परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रामप्रसाद बोर्डीकर याचा शेतकरी विमा घोटाळा काढून त्याला न्यायालयीन लढाईचे रुप देण्यातही राष्ट्रवादीच्या स्थानिक ते वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचाच पाठींबा होता. ज्याचा परिणाम 2014 च्या निवडणुकीत झाला. भांबळे विजयी झाले तर बोर्डीकर पराभूत. भांबळे यांनीही न थांबता आता जिंतूर नगर परिषद, मतदार संघातील सर्वच जिल्हा परिषद, आदी शक्तिस्थळ आपल्या ताब्यात घेऊन आपले स्वतंत्र वर्चस्व पूर्ण मतदार संघावर प्रस्थपित केले आहे. त्यामुळे बोर्डीकरांनी आता भाजपची कास धरली असून यंदा रामप्रसाद बोर्डीकर अथवा त्यांच्या कन्या मेघना साकोरे बोर्डीकर या विधानसभा निवडणुकीत विजय भांबळे यांच्या विरोधात निवडणुकीत उभं राहणार हे निश्चित झालं आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार विजय भांबळे यांनी जरी 27 हजारांचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला होता. यंदा तशी परिस्थिती राहिली नाही दुसरीकडे मतदार संघातील समस्यांचा गुंता विजय भांबळे यांना सोडवता आला नसल्याने त्यांची घटलेली लोकांमधील प्रतिमा,अधिकाऱ्यांविषयी नेहमीच अरेरावीची भाषा आदी विषय पाहता यंदाची निवडणूक भांबळे यांच्यासाठी सोपी राहिली नाही. तिकडे इतके वर्ष शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ भाजप सोडवून घेत रामप्रसाद बोर्डीकर यांना निवडणुकीत उतरणार कि त्यांची कन्या मेघना याना संधी देणार यावरही बरीचं गणित अवलंबून असणार आहेत.त्यातच राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकरयांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन जिंतूर,सेलू विधानसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी केल्याने बोर्डीकरांच्या वाटेत अडथळा निर्माण झाल्याने कुणाला संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
वंचित ठरणार किंगमेकर
जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातील आठरा पघड जातींच्या मतदारांची संख्या पाहता या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच किंगमेकर ठरणार हे निश्चित झालंय त्यांमुळे अनेक जण वंचित कडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत.
जिंतूर मतदार संघावर दृष्टीक्षेप
विद्यमान आमदार विजय भांबळे
पक्ष - राष्ट्रवादी
तालुके -जिंतूर,सेलू
एकुण गाव - 262
एकूण मतदार - 3लाख 45 हजार 127
गंभीर प्रश्न
मतदार संघात एकही साखर कारखाना नाही
येलदरी सारखे धरण असताना मासेमारी व्यवसाय ठप्प,पर्यटनाला हि चालना नाही
रस्ते,रोजगार,शिक्षण,आरोग्य समस्या गंभीर
एमआयडीसी ची झालेली वाताहत
लोअर दुधना प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्ण
जिंतूर विधानसभा मतदारसंघ : यंदाही बोर्डीकर-भांबळे यांच्यात लढत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2019 06:45 PM (IST)
1990 ते 2014 अशा एकूण 6 विधानसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा मतदार संघावर सलग 10-10 वर्ष दोन वेळेला रामप्रसाद बोर्डीकरांनी आपले एकहाती वर्चस्व मिळवले होते. 1999 साली झालेल्या निवडणुकीत कुंडलिक नागरे यांनी 2014 च्या निवडणुकीत विजय भांबळे हे अपवाद वगळता बोर्डीकर चार वेळेला इथे आमदार म्हणुन निवडून आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -