सप्टेंबर 11, 2001 जागतिक इतिहासात सदैव स्मरणात राहील असा दिवस. अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील अल-कायदा प्रणित हल्ल्याने फक्त अमेरिकाच नाही तर सगळे जग हादरले. या हल्ल्यानंतर सर्वत्र चर्चेत आलेले नाव म्हणजे ओसामा बिन लादेन व अल कायदा.
9/11 नंतर अल-कायदा व बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी अमेरिका व त्याच्या काही मित्र राष्ट्रांनी मिळून पश्चिम आशियात दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले. अफगाणिस्तानपासून सुरु झालेल्या या युद्धाला 18 वर्ष पूर्ण झाली, परंतु अमेरिकेचा पश्चिम आशियात सपशेल पराभव होत असल्याचे आपल्याला दिसेल. अमेरिका व अन्य पाश्चिमात्य देशांच्या धोरणांमुळे मागच्या काही वर्षांमध्ये पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेतील लिबिया, इराक, अफगाणिस्तान, येमेन व सीरिया या पाच देशांमध्ये यादवी माजली असून येथे ‘राष्ट्र-राज्य’ या संकल्पनेला आव्हान देत अल कायदा, आयसिस, अल नुसरा यांसारख्या दहशतवादी संघटना मोठ्या ताकदीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून खात्मा केला जरूर परंतु बिन लादेनची ध्येय धोरणे समजवून घेण्यात अमेरिकी राज्यकर्ते कमी पडले आहेत. आज पश्चिम आशियात व उत्तर आफ्रिकेत अनेक राष्ट्रांमध्ये जी यादवी माजली आहे ते बिन लादेनला अपेक्षितच होते व 9/11 त्याची सुरुवात होती.
संवाद कौशल्य ही बिन लादेनची एक जमेची बाजू होती. आपल्या व्याख्यानांमधून व सहकाऱ्यांबरोबरील संवादातून ओसामा बिन लादेनने आपली तीन प्रमुख उद्दिष्ट स्पष्टपणे मांडली होती, परंतु अमेरिकेने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं.
ओसामा बिन लादेनची 3 प्रमुख उद्दिष्ट पुढीलप्रमाणे होती:
1. अमेरिकेला दिवाळखोर राष्ट्र बनवणे
2. अमेरिकेच्या सैन्याला व गुप्तचर यंत्रणेला अशा युद्धात ओढणे की त्यातून हा देश, त्याचे सैन्य व गुप्तचर यंत्रणा अधिकाधिक कमकुवत होतील
3.अमेरिका व त्यांच्या मित्र राष्ट्रांमध्ये तेढ निर्माण करणे व अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात शक्य तितके जास्त मतभेद निर्माण करणे
पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटन, फ्रान्स या देशांनी ऑटोमन साम्राज्याचे विभाजन करुन इराक, जॉर्डन, इस्राईल यासारखे विविध देश पश्चिम आशियात निर्माण केले. ऑटोमन साम्राज्याचे गतवैभव परत मिळवणे व इस्लामी राजवट पुन्हा अस्तित्वात आणणे हे ओसामा बिन लादेनचे अंतिम ध्येय होते. 9/11 हल्ला या ध्येयाचा एक प्रमुख भाग होता.
आज अमेरिका पश्चिम आशियात अशा एका युद्धात ओढले गेले आहे की ज्यातून त्यांची सुटका होणे कठीण आहे, उलट अमेरिकेसमोरील आव्हानं वाढतच आहेत. ओसामा बिन लादेन जरी आज नसला तरी त्याला आदर्श मानून काम करणाऱ्या अनेक नव्या संघटना पश्चिम आशियात अमेरिकेच्या धोरणांमुळे अस्तित्वात आल्या आहेत. इस्रायलचे जगाच्या नकाशावरून समूळ उच्चाटन करणे हे देखील बिन लादेनचे ध्येय होते, परंतु त्याला जाणीव होती की जोपर्यंत अमेरिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तोपर्यंत इस्रायलला नेस्तनाभूत करणे कठीण आहे. अरब राष्ट्रांनी आजपर्यंत इस्राईल विरुद्ध अनेक युद्ध केली, परंतु अमेरिकेचा इस्रायलला भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे अरब राष्ट्रांचा नेहमीच पराभव झालेला आहे.
पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेतील सध्याची परिस्थिती बिकट आहे. भविष्यात इराण आण्विक शस्त्र निर्माण करण्यात यशस्वी झाला तर येथील अन्य अरब राष्ट्रांमध्ये असुरक्षितता निर्माण होऊन या भागात आण्विक शस्त्रांची स्पर्धा निर्माण होईल. पश्चिम आशियात आण्विक शस्त्र आल्यास व त्यातील काही शस्त्रे, तसंच वापराचे तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती आल्यास भविष्यात रासायनिक किंवा आण्विक शस्त्रे वापरून आणखी आण्विक हल्ले होऊ शकतील. पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता या देशातील आण्विक शस्त्रे देखील दहशतवाद्यांच्या हाती लागू शकतात.
दहशतवादाचा खात्मा करून पाश्चिमात्य लोकशाही व्यवस्था पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेत रुजवण्याचा विचार अमेरिकी राज्यकर्त्यांनी 9/11 नंतर अनेकदा मांडला, पण दुर्दैवाने आज परिस्थिती इतकी खराब झाली आहे की लोकशाही सोडाच राष्ट्र-राज्य ही संकल्पनाच येथे उध्वस्त होत असल्याचे चित्र आपल्याला दिसेल.