पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचा बोलबाला दिसत आहे. म्हणूनच भाजपचा चिंचवडवर दावा आहे. सलग दोनवेळा निवडून आलेले लक्ष्मण जगताप हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत. 2009 च्या पुनर्रचनेनंतर हा मतदार संघ स्थापन झाला. तेव्हा पहिल्यांदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर लक्ष्मण जगताप येथून आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा असणाऱ्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही. तर लक्ष्मण जगतापांचे प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे युतीच्या निर्णयावर लक्ष देऊन आहेत.


चिंचवड विधानसभा मतदारसंघ अनेक गावांचा मिळून तयार झाला आहे. आयटीयन्स, उद्योजक, वाणिज्य व्यावसायिक असा मोठा वर्ग. पिंपरी विधानसभेच्या तुलनेत झोपडपट्टीचा नगण्य परिसर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असल्याने हा सुशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. असं असलं तरी याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोक नोकरीसाठी येथे स्थलांतरित झाले आहेत. म्हणूनच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार अशी ही या मतदारसंघाची ओळख आहे.


2009 च्या विधानसभेसाठी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मण जगतापांनी अपक्ष उभे राहून नशिब अजमावलं आणि आघाडीच्या भाऊसाहेब भोईर यांना धोबीपछाड केलं. नंतर लक्ष्मण जगतापांनी स्वगृही परतत 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली. पण अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आघाडी सरकारने असमर्थता दाखवली, अशी ओरड जगतापांनी सुरु केली. म्हणूनच 2014 ची लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट नाकारत शेकाप आणि मनसेच्या गटाकडून निवडणूक लढली. मात्र युतीच्या श्रीरंग बारणेंकडून जगतापांना पराभव चाखावा लागला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर 2014 च्या विधानसभेला लक्ष्मण जगतापांनी भाजपशी घरोबा केला आणि ते आमदार झाले. त्यानंतर महापालिकेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.


दोन आमदार आणि महापालिकेतील सत्तेच्या निमित्ताने शहरात भाजपची ताकद वाढली. म्हणूनच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीला येथून प्रचंड मताधिक्य मिळणार यात शंका नव्हती. पण जगतापांचे कट्टर विरोधक श्रीरंग बारणे यांना युतीचे तिकीट मिळणार म्हणून आणि तिकीट घोषित झाल्यानंतर ही मोठे डावपेच रंगले. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना जगताप मदत करतील अशीच शक्यता वर्तवली जात होती. मात्र उच्च पातळीवर चर्चा घडवत श्रीरंग बारणेंनी जगतापांशी सूत जुळवलं आणि खासदारकी पदरात पाडून घेतली. तेव्हा चिंचवड विधानसभेतून युतीला 96 हजार 758 मतांचं विक्रमी मताधिक्य मिळालं. याच प्रचंड मताधिक्याच्या जोरावर युती अर्थात भाजपचे लक्ष्मण जगताप हॅट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत.


2019 च्या विधानसभेपूर्वी युतीत फूट झाल्यास लक्ष्मण जगतापांना अधिकचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. कारण युतीत फूट पडल्यास जगतापांचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी आहे. पण त्यांच्याकडे म्हणावा तसा तगडा उमेदवार नाही. हा लेखाजोखा पाहता, चिंचवड विधानसभेतून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होईल.


मावळ लोकसभा 2019 ला चिंचवड विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं


श्रीरंग बारणे (शिवसेना) - 1 लाख 76 हजार 475 (विजयी)
पार्थ अजित पवार (राष्ट्रवादी) - 79 हजार 717