मुंबई : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या मध्यभागी असलेला चेंबूर विधानसभा मतदारसंघ मुंबईत पूर्व उपनगरातील सर्वात वेगाने विकसित होणारी प्राईम लोकॅलिटी म्हणून पहिली जातेय. झपाट्याने उभे राहणारे रेसिडेंशियल टॉवर्स आणि मेट्रो-मोनो रेलसारख्या पायाभूत सुविधांमुळे इथल्या रियल इस्टेट मार्केटला चांगलाच बुस्ट मिळाला आहे. मात्र तरीही चेंबूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला अजूनही झोपडपट्ट्यांचे साम्राज्य आहे तर पूर्वेला पुनर्विकासात अडकलेले जुने आलिशान बंगले आणि हाई राईज टॉवर्स.
पुनर्विकास आणि पायाभूत विकासाचा प्रश्न
चेंबूरमधल्या नगरिकांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न म्हणजे रखडलेला पुनर्विकास आणि विकासकांकडून होणारी फसवणूक. गेल्या 14 वर्षांपासून सिद्धार्थ कॉलनीचा पुनर्विकास रखडला आहे. तर चेंबूरच्या घाटल्यात बारा वर्षांपासून लोकं नव्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. विकासकांच्या वीज बिल भरण्याच्या अश्वासनामुळे 77 कोटी रुपयांचं वीज बिल थकलं आहे. यामुळे सिद्धार्थ कॉलनीतील तीन हजार घरांना आज अंधारात राहण्याची वेळ आलीय. तसेच सिंधी कॅम्पमधील 60 -70 वर्षं जुन्या रेफ्युजी इमारती जीर्ण अवस्थेत असून तेथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मेट्रो आणि मोनो रेलसारख्या प्रकल्पांच्या कामांमुळे रस्त्यांची झालेली दुरस्वस्था आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सध्या चेंबूरकारांसाठी मोठी डोकेदुखी ठरतेय.
माहुलला प्रदूषणाचा विळखा
दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो HPCL, BPCL, RCF, TATA या केमिकल कंपन्यांमुळे माहुलवासीय आणि चेंबूरमधील नागरिकांना होणारा प्रदूषणाचा त्रास. माहुल गावातील नागरिकांना तर श्वसनाच्या व्याधी आणि त्वचा रोगांमुळे जगणं असह्य झालंय. त्याचसोबत स्वच्छ पाणी, रस्ते, शाळा, हॉस्पिटल सारख्या मूलभूत सुविधांचा वाणवा असल्याने त्यांचा इतर ठिकाणी पुनर्वसनासाठी सरकारशी अविरत संघर्ष सुरु आहे. मात्र अनेक आंदोलने आणि कोर्टाच्या फेऱ्यानंतरही हाती निराशाच आली.
संमिश्र मतदारसंघ
चेंबूरच्या लोकसंख्येकडे पाहता या मतदारसंघात मराठी टक्का मोठा आहे. तसेच दलित आणि उत्तरभारतीय मतंही निर्णयाक ठरतात. त्याचसोबत दक्षिण भारतीय आणि सिंधी-पंजाबींचे वर्चस्व असणारे काही पॉकेट्स आहेत. यामुळे एकूणच हा मतदारसंघ संमिश्र अशा स्वरुपाचा आहे.
शिवसेना-भाजपात रस्सीखेच
पूर्वी काँग्रेसमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांचा या परिसरात दबदबा होता. मात्र 2014 ला काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने मोदी लाटेतही अनपेक्षीतपणे शिवसेनेने येथे मुसंडी मारली. भाजपची परंपरागत जागा शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांनी सर केली आणि युती तुटल्याचा फटका या जागेवर भाजपला बसला. मनसेही इथे काही ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवून आहे. तर रिपाईमधून दीपक निकाळजे पी. एल. लोखंडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, सुभाष नगर येथील दलित मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसचं नुकसान करतात. त्यात भर पाडायला यंदा वंचित बहुजन आघाडीचं आव्हान असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला या पट्ट्यातून चांगला लीड मिळाला आहे, असं असलं तरी युतीच्या भवितव्यावर या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. परंपरागत भाजपची जागा असल्याने भाजपला ही जागा सुटण्याची आशा आहे. टिळकनगरच्या प्रसिद्ध सह्याद्री क्रीडा व गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष राहुल वाळुंज भाजपकडून या जागेसाठी जोर लावत आहेत.
अशा परिस्थितीत चेंबूरकरांच्या समस्यांचं निराकरण की इथल्या जातीय समीकरण यापैकी कशाच्या आधारावर इथला सुज्ञ मतदार कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
पक्षीय बलाबल
चेंबूर विधानसभेच्या पाच वॉर्डात शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन तर काँग्रेसची एक नगरसेविका आहे.
2014 विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी
- प्रकाश फातर्पेकर (शिवसेना) - 47,410
- चंद्रकांत हांडोरे (काँग्रेस) - 37,383
- दीपक निकाळजे (रिपाई) - 36,615
- सारिका थडाणी (मनसे) - 5,832