अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. याशिवाय भंडारदरा, हरिश्चंद्रगड यांसारखे अनेक पर्यटन स्थळं याठिकाणी आहेत. त्यामुळे हा भाग महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर मधुकर पिचड याचं नाव अकोले तालुक्यात अग्रस्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड 1980 ते 2014 पर्यंत सलग सात वेळा अकोले मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना मतदारांनी आमदारकीची संधी दिली. अशारीतीने गेली जवळपास 40 वर्ष याठिकाणी पिचड कुटुंबिय आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र मधुकर पिचड आणि विद्यमान आमदार वैभव पिचड यांनी आता भाजप प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा हा गड हातून निसटण्याची दाट शक्यता आहे.


मतदारसंघाची पार्श्वभूमी


अकोले तालुक्याची आदिवासी तालुका अशी ओळख आहे. त्यामुळे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहे. मात्र मधुकर पिचड यांच्याशिवाय या मतदारसंघातून कोणतंही मोठं नेतृत्व तयार झालं नाही. 35 वर्ष या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दित आघाडीची सत्ता असताना अनेक मंत्रिपदं भूषवली. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणुकीत मधुकर पिचड यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुत्र वैभव पिचड यांना निवडलं.




वैभव पिचड यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मधुकर तळपाडे यांना धुळ चारत विधासभेत एन्ट्री केली.  2014 विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांनी तळपाडे यांचा 20,062 मतांनी पराभव केला. शिवसेना-भाजप 2014 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढल्याने मतांची विभागणी झाली होती, याचा फायदा वैभव पिचड यांना झाला. अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 38 हजार 420 मतदार आहेत.


विधानसभा निवडणूक 2014 निकाल

  • वैभव पिचड (राष्ट्रवादी) - 67, 696 (विजयी)

  • मधूकर तळपाडे, (शिवसेना) - 47,634

  • अशोक भांगरे, भाजपा - 27,446

  • गंगा भांगरे (माकप) - 11,861

  • सतीश भांगरे (काँग्रेस) - 4391


 

पिचड पिता-पुत्र भाजप प्रवेशाने विरोधकांची कोंडी


पिचड पिता-पुत्रांनी भाजप प्रवेश केल्याने आज तरी विरोधकांना कोंडीत पकडण्यात ते यशस्वी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. दुसरीकडे पिचड यांचे परंपरागत विरोधक समजले जाणारे अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे हे भाजपात असून त्यांची आगामी राजकीय भूमिका काय राहणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांची भेट घेतली असून ते पिचड विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


मधूकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादीत असेपर्यंत शिवसेनेकडून सतीश भांगरे, मधुकर तळपाडे आणि भाजपकडून अशोक भांगरे, किरण लहामटे अकोले मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छूक उमेदवार होते. मात्र आता पिचडांनी भाजप प्रवेश केल्याने विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला वैभव पिचड यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधणंही मोठं आव्हान असणार आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीत युतीकडून किंवा भाजपकडून (युती न झाल्यास) वैभव पिचड यांना उमेदवारी जळवपास निश्चित आहे. मधूकर पिचड यांचा या मतदारसंघावर दबदबा असल्याने काँग्रेसचंही नेतृत्व याठिकाणी निर्माण होऊ शकलं नाही. तसेच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत असलेले चांगले संबंध वैभव पिचड यांना आगामी निवडणुकीत फायदेशीर ठरु शकतात.


किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी मोठं शेतकरी आंदोलन याठिकाणाहून उभं केलं होतं. मुख्यमंत्र्यांनाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. त्यानंतरही सातत्याने नवले यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने केली. त्यामुळे मोठा शेतकरी वर्ग अजित नवले यांच्या मागे उभा आहे. याचा फायदा माकपच्या उमेदवारांना मिळून काहीअंशी मतविभाजन होऊ शकतं. तसेच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही येथे महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो.




बालेकिल्ला राखण्यासाठी पिचडांसमोरील आव्हान


पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना आदिवासी मतांवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. कारण भाजप प्रवेशानंतर पिचड पिता-पुत्रांविरोधात अनेक मोर्चे अकोल्यात निघाले होते. या मोर्चांमध्ये आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. पिचड यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अशोक भांगरे यांनी केली. आघाडीची सत्ता येणार नाही म्हणून मतदारसंघातील विकामकामे व्हावी, यासाठी भाजपमध्ये जात असल्याचं पिचड पिता-पुत्रांनी सांगितलं होतं. मात्र आता मतदारसंघातून त्यांना मोठा विरोध होत आहे. महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांनीही त्यांना विरोध दर्शवला आहे. याचा फटका वैभव पिचड यांना निवडणुकीत बसू शकतो.


मतदारसंघातील समस्या


अकोले विधानसभा मतदार संघ पर्यटनाचं मोठं केंद्र आहे. एकीकडे राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना अकोले सारख्या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष होत आहे. अकोले, भंडारदरा, घाटघर याठिकाणच्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आदिवासी तालुका म्हणून ओळख असली तरी आदिवासींच्या समस्या जैसे थे आहेत.


भाजप प्रवेशानंतर मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्यासमोर स्थानिक भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं मोठं आव्हान आहे. भाजप प्रवेशानंतर आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या मतदार संघात शिवसेनेच्या भूमिकेला महत्व असून युती होणार की नाही, यावर अनेक गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे पिचड कुटुबियांचा हा बालेकिल्ला अजिंक्य राहणार का? हे आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल.