नंदुरबार : राज्यातील पहिला क्रमांकाचा मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा अक्राणी मतदार संघ. या मतदारसंघाची संघाची दुसरी ओळख म्हणजे भौगलिकदृष्ट्या सर्वात प्रतिकूल आणि सर्वात मोठा मतदारसंघ अशी आहे. सातपुडा डोंगररांगांमध्ये विस्तारलेला हा विधानसभा मतदारसंघ जसा निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी प्रशासनाची कसरत घेतो, तसाच राजकीय नेत्यांची कसब पणाला लावणारा आहे. 1995 पासून आमदार के सी पाडवी या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहे.


या मतदारसंघातील भाग दुर्गम असला तरी प्रचंड जनसंपर्क आणि कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांच्या आजपर्यंतच्या विजयाचे गमक आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपने अनेक वेळा या मतदारसंघात कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी खेळी खेळल्या, मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही. 1995 साली केसी पाडवी यांनी अक्राणी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघाचे चित्र पालटले. तेव्हापासून या मतदारसंघात त्यांना कुणी पराभूत करु शकले नाही. अनेकदा त्यांना जास्त उमेदवारामुळे मतविभाजनाचा फायदा झाल्याचे दिसून येते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून आमदार के.सी पाडवी यांनी उमेदवारी दिली होती. यावेळेस त्यांचे मताधिक्य कमी झाल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या मतदारसंघात अवघ्या 279 मंताची आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर पाहण्यास मिळेल.


अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातील एकूण 2 लाख 72 हजार 972 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 37 हजार 522 पुरुष तर 1 लाख 35 हजर 449 स्त्री मतदार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील चार मतदार संघापैकी हा सर्वात कठीण मतदारसंघ असून या मतदारसंघात आधीपासून कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलं आहे. याआधी या मतदारसंघाला शहादा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट जोडण्यात आला होता. मात्र 2009 च्या पुनर्रचनेत या मतदारसंघाला संपूर्ण डोंगरी भाग जोडण्यात आला असून अक्कलकुवा –अक्राणी मतदार संघ नाव देण्यात आले आहे .


2014 विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी




  • के .सी.पाडवी (कॉंग्रेस) - 64,410 मते

  • विजयसिंग पराडके (राष्ट्रवादी) 48,635 मते

  • नागेश पाडवी (भाजपा) 32,000 मते

  • आमश्या पाडवी (शिवसेना) 10,000 मते


या मतदारसंघातील 95 टक्के मतदार आदिवासी असून हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. 1995 पासून आमदार के सी पाडवी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेसाठी सुटलेला आहे. जिल्हाप्रमुख आणि आक्रमक आदिवासी नेते म्हणून ओळखले जाणारे आमश्या पाडवी याठिकाणी उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहे. मात्र भाजपचे काही स्थानिक नेते बंडखोरी करण्याचा तयारीत असल्याची चर्चा या मतदारसंघात आहे.


अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ सातपुड्याचा दऱ्या खोऱ्यात असल्याने या मतदारसंघातील समस्या अधिक आहेत. याठिकाणी बऱ्यापैकी रस्ते आरोग्य शिक्षण या सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र अजून बराचसा भाग भौगलिक परिस्थितीमुळे अजून अनेक समस्या आहेत. त्या सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत, मात्र त्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, असं चित्र या भागात पाहण्यास मिळत आहे.


मतदारसंघातील समस्या




  • या भागात रोजगाराच्या कोणत्याही संधी नाहीत, म्हणून आदिवासी बांधव स्थलांतर करतात.

  • शेतीसाठी सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.

  • मतदारसंघातील 73 वन गावांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.

  • दुर्गम भागात अजून रस्ते, आरोग्य या मुलभूत सुविधाचा अभाव आहे.

  • अतिक्रमित वनजमिनीचे अनेक दावे प्रलंबित


या मतदार संघातील समस्या अजून काही अंशी सुटलेल्या नाहीत. कॉंग्रेसचा पारंपरिक गड असलेल्या मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मताधिक्य कमी झाले आहे. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसला अधिक मेहनत घ्यावी लागेल. तसेच भाजपा आणि शिवसेना युतीत या मतदारसंघात उमेदवारीवरुन संघर्ष अटळ आहे. यातून यांच्यात होणारे मतविभाजन राष्ट्रवादीची भूमिका आणि सुरु असलेली पक्षांतराची चर्चा काय रंग भरते, या गोष्टी महत्वाच्या आहेत.