मुंबई : महाराष्ट्रात भयंकर पूरपरिस्थितीचा थेट फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. आतापर्यंत गेल्या 10 दिवसात 50 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
एसटीचे अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचे आतोनात नुकसान झाले आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतरच या स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा नक्की आकडा समजू शकेल. मात्र सद्यस्थितीला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे.
एसटीचा दररोज 18 हजार बसेसच्या माध्यमातून 55 लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. त्यातून सरासरी 22 कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दहा दिवसापासून दररोज एसटीचे किमान 10 लाख किमीच्या बस फेऱ्या रद्द होत आहेत. साहजिकच त्यामुळे एसटीच्या 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.
एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या 12 आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. हीच परिस्थिती सांगली, सातारा व कोकणातील काही विभागामध्ये आहे. पुढील काही दिवसामध्ये पूर ओसरल्यानंतरच प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा स्पष्ट होऊ शकेल.