Vishwajeet Kadam on Sanjay Raut : गेल्या वेळी मी निवडून आलो आणि सरकार येईल असे वाटत नव्हते. मी विनोदाने म्हणत असतो, संजय राऊत याच्या अंगात आले आणि सरकार आले, पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातील कधी उतरलेच नाही म्हणून सरकार गेल्याची टीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. सांगलीमधील कडेगाव तालुक्यात प्रचार सभेदरम्यान कदम बोलत होते. सांगली लोकसभेच्या वादापासून सातत्याने विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात सातत्याने खटके उडाले आहेत. 


आणि आमच्या महायुतीच्या नेत्यांनी झक मारली


विश्वजित कदम म्हणाले की, पॉस्कोन कंपनी महाराष्ट्र मध्ये येणार होती. 2 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. पण दिल्लीतून फोन आला आणि आमच्या महायुतीच्या नेत्यांनी झक मारली आणि कंपनी गुजरातला देऊन टाकली. आपला हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, पण या महायुतीच्या नेत्यांनी पाप केले. या महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरातसमोर झुकावे लागले, पण तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहा, पुन्हा महाराष्ट्र कुणाच्या बापाच्या समोर झुकणार नाही, असे विश्वजित कदम म्हणाले. 


खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम आता आमनेसामने 


दरम्यान, सांगलीत जयश्री पाटील यांच्या उमेदवारीवरून खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम आमने-सामने आले आहेत. लोकसभेला बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरून निवडणूक जिंकलेल्या विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी जयश्री पाटील यांच्या प्रचारसभेत सहभागी होत त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगलीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील आहेत. 


तसेच यावर ठाम राहत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या विश्वजित कदम यांनी विधानसभेवेळी वेगळा पवित्रा घेतला आहे. बंडखोरास मत दिले तर ती भाजपाला मदत होणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगत एक प्रकारे जयश्री पाटील यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या