मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. यापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यापैकी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक (LokSabha Election Result 2024) सर्वाधिक चुरशीची झाली. या मतदारसंघातील संपूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान प्रचंड चुरस पाहायला मिळाली. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होती. मतमोजणीवेळी या दोन्ही उमेदवारांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली.


आज सकाळी उत्तर मध्य मुंबईत मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काही काळासाठी वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या  उज्ज्वल निकम यांनी आपले मताधिक्य वाढवत नेले. मध्यंतरीच्या काळात उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य 56 हजारापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा पराभव होणार, अशी चर्चा होऊ लागली होती. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये हे चित्र पूर्णपणे पालटले. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी 56 हजारावरुन प्रथम दीड हजारापर्यंत आणि नंतर 700 मतांपर्यंत खाली आणली. शेवटच्या फेरीत उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात अवघ्या 176 मतांचा फरक होता. त्यामुळे कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी निसटती आघाडी घेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. वर्षा गायकवाड यांच्या विजयामुळे मुंबईत महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांची संख्या पाचवर पोहोचली आहे. 


मुंबईत ठाकरेंचा डंका


लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गट आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा पाहायला मिळाली होती. मात्र, या लढाईत ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गट दोघांनाही धूळ चारल्याचे दिसून आले. दक्षिण मुंबईतील लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. तर दक्षिण मध्य मुंबईत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल देसाई यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांच्यावर मात केली. तर ईशान्य मुंबईत ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करण्याचा चमत्कार करुन दाखवला. तर वायव्य मुंबईत ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांनी शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा पराभव केला.


आणखी वाचा


इंडिया आघाडीला झंझावाती यश, भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर राहण्याची शक्यता; राहुल गांधी काय बोलणार?