मुंबई : "साहेब, सगळ्यांचा बदला घेतला" त्यानंतर साहेब म्हणाले, "वेल डन, अभिनंदन!". हा गँग्ज ऑफ वासेपूरमधील "सबका बदला लेगा फैजल" अशा आशयाचा संवाद नाही, तर हा संवाद दोन खासदारांमधील आहे.


नांदेडमधील भाजपचे नवनिर्वाचित खासदार प्रतापराव चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट सामान्य नव्हती असच म्हणावं लागेल. कारण या दोन नेत्यांमधील काही सेकंदाच्या संवादात अनेक लपलेल्या बाबी उघड करत आहे.


प्रतापराव चिखलीकर हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आले असले तरी, त्यांचं मूळ काँग्रेसचं आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे ते खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. पण चिखलीकर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक मानले जातात. यापूर्वी अनेकदा चिखलीकर आणि चव्हाण यांच्यातला कलगीतुरा मराठवाड्याने पाहिला आहे.


आता नारायण राणे आणि प्रतावराव चिखलीकर यांच्यातील संवादाचा नेमका अर्थ काय आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेल राज्यात काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यामध्ये अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांचा समावेश होता. मात्र यंदा प्रतापराव चिखलीकरांना लोकसभा निडणुकीत काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा पराभव केला आहे.



नारायण राणे ज्यावेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री पदाचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. मात्र एका म्यानेत दोन तलवारी राहणे शक्य नव्हते. त्यातून नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांचा राजकीय संघर्ष सुरु झाला. दोघांमधील अंतर्गत धुसपूस विविध कारणांनी समोर आली. अशोक चव्हाण राज्यातील काँग्रेसमधील वजनदार नेते असल्याने त्याचा नारायण राणे नेहमीच फटका बसला. यातून नारायण राणे आणि अशोक चव्हाण एकमेकांचे राजकीय शत्रू बनले. नारायण राणे आपल्या मनातील नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.


तर 2004 च्या निवडणुकीत चिखलीकरांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र अशोक चव्हाणांच्या विरोधामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्‍ट्रवादीचे शंकर धोंडगे यांच्यावर विजय मिळवला. मात्र त्यानंतर आघाडी सरकारलाच अपक्ष म्हणून पाठिंबा जाहीर केला. 2009 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. मात्र तेव्हाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार असूनही चिखलीकरांना उमेदवारी मिळाली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा अपक्ष म्हणून धोंडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. म्हणजे अशोक चव्हाणांनी चिखलीकरांना राजकारणात नेहमी दाबण्याचा प्रयत्न केला होता. हा राग चिखलीकरांच्या मनात आहे.


त्यामुळे दुश्मन का दुश्मन दोस्त या नात्याने प्रतापराव चिखलीकरांना नारायण राणे यांची भेट घेतली आणि आपला आनंद व्यक्त केला. "साहेब, सगळ्यांचा बदला घेतला" असं चिखलीकरांना नारायण राणेंना सांगितलं. त्यानंतर नारायण राणेंनी "वेल डन, अभिनंदन!" असं म्हटलं.


प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात असला तरी तो नांदेड लोकसभा मतदारसंघाचा भाग नाही. म्हणूनच चिखलीकर यांनी मिळवलेलं यश लक्षणीय आहे.


अशोक चव्हाण यांच्याशी असलेला विरोध व्यक्त करण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांनी जवळपास सर्वच पक्षांची सैर केलीय. काँग्रेस कार्यकर्ते असले तरी त्यांनी 2004 ला बंडखोरी केली कारण त्यांचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटला, त्यानंतर 2012 मध्ये राष्ट्रवादीत गेले. 2014 ला शंकरअण्णा धोंडगे यांच्या विरोधात तिकीट मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडूनही आले. मात्र गेली साडेचारवर्षे ते पूर्णपणे भाजपच्याच संपर्कात राहिले. याचंच बक्षिस म्हणून त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली.


अशोक चव्हाणांच्या पराभवात वंचित बहुजन आघाडीचाही मोठा वाटा आहे. भाजपच्या प्रताप चिखलीकर पाटील यांना 4 लाख 08 हजार 977 मते मिळाली. काँग्रेसच्या अशोक चव्हाण 3 लाख 67 हजार 694 वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना 1 लाख 44 हजार 586 मते मिळाली. या आकडेवारीवर नजर टाकली तर चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्या मतांमध्ये 41 हजार 483 मतांचा फरक आहे. वंचितच्या उमेदवादाराला मिळालेल्या मतांना थेट फटका अशोक चव्हाण यांना बसला आहे.