जॉन बेली...भारतात येणारा पहिला ऑस्कर अध्यक्ष


मराठी सिनेसृष्टीची 100 वर्ष आणि ऑस्करच्या 90 वर्षांच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असं घडत असावं, की ऑस्करचा अध्यक्ष भारतात येत आहेत.  25 तारखेला मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य चित्रपट सोहळ्यासाठी जॉन बेली भारतात येणार आहेत.

कोण आहेत जॉन बेली?
70च्या दशकात हॉलीवुडमधल्या सगळ्याच दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांना सिनेमॅटोग्राफर म्हणून सर्वात जास्त पसंत असलेलं नाव म्हणजे जॉन बेली.

10 ऑगस्ट 1942 साली अमेरिकेच्या मिझोरीमध्ये त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणही कला क्षेत्रातच घेतलं. शिक्षणपूर्ण करुन 1971 साली सिनेमॅटोग्राफर म्हणून जॉन बेली यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. मॅड डॉग्ज आणि इंग्लिशमन नावाच्या चित्रपटातून सिनेमॅटोग्राफीच्या जगात त्यांनी पाऊल टाकले.

मात्र,ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या डेज ऑफ हेवन (1978) चित्रपटानंतर जॉन बेलींची खरी ओळख निर्माण झाली. 70 पेक्षा जास्त चित्रपटांचं जॉन बेलींनी चित्रण केले आहे. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे तो म्हणजे 1993 साली आलेला क्राईम थ्रीलर 'इन द लाईन ऑफ फायर'. हा चित्रपट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येवरच्या प्रसंगावरुन चित्रित केला होता.

सिनेमॅटोग्राफीबरोबरच जॉन यांनी चित्रपटांसह टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शनही केले. त्यांच्या 'सर्च फॉर साईन ऑफ इंटेलिजंट लाईन इन युनिव्हर्स' मालिकेचा 1985 साली कान्स चित्रपट मोहोत्सवात गौरव करण्यात आला.

कायम आपल्या फ्रेम्सनं जगाला वेडं लावणारे जॉन बेली 2018 साली नव्या वादात सापडले. ऑस्कर अकॅदमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वर्षभरातच लैंगिक शोषणाच्या आरोपांना त्यांना सामोरं जावं लागले. त्यावेळी त्यांना ऑस्करच्या समितीतून वगळ्याची मागणीही झाली, मात्र कॅमेऱ्यातील रोल्सप्रमाणे नियतीनं त्यांच्या आयुष्यातील हा काळ बदलून टाकला.

आता जॉन बेली २५ मे व २६ मे असे दोन दिवस मुंबईत येत आहेत. या दोन दिवसांत बेली महाराष्ट्र मराठी चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत .राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ५६वे वर्ष आहे. चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.