दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या, राज्यातील 10 मतदारसंघात गुरुवारी (18 एप्रिल) मतदान
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2019 10:08 AM (IST)
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी म्हणजेच 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. देशभरातील 13 राज्यांमधल्या एकूण 97 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात दिग्गज नेत्यांकडून दिवसभर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सोलापूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील अमरावती येथील युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा समावेश आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल. आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. याआधी युती, आघाडीच्या उमेदवारांकडून अंतिम टप्प्यात सर्वसामान्यांच्या भेटी, सभांचा जोर वाढलेला आहे. गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती अकोल्यात तिरंगी सामना अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रेंना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 मधील निवडणुकीत धोत्रेंनी हिदायत पटेल यांना पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी पटेल उत्सुक असतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदाही अकोल्यातील लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यात गेल्या वेळी प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी होते. सोलापुरातही तिहेरी लढत भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नाही-नाही म्हणताना काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची शिंदेंना संधी आहे. मात्र आंबेडकरांचं आव्हान तगडं ठरल्यास सोलापुरातही तिहेरी लढत होणार. अमरावतीत पुन्हा अडसूळ विरुद्ध नवनीत राणा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. नवनीत राणा आपल्या 'युवा स्वाभिमान पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यांना महाआघाडीचा पाठिंबा आहे. त्यामुळे 2014 मधील हायव्होल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित.