मुंबई : हार्दिक पंड्याच्या निर्णायक खेळीमुळे मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबईचा आठ सामन्यांमधला हा पाचवा विजय ठरला. तर बंगलोरला यंदाच्या आयपीएलमध्ये सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात बंगलोरने मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान पाच विकेट्स आणि सहा चेंडू राखून पार केलं.


सलामीच्या क्विंटन डी कॉकने 26 चेंडूत 40 धावा फटकावल्या. अखेरच्या दोन षटकांत 22 धावा हव्या असताना हार्दिक पंड्याने पवन नेगीच्या एकाच षटकात या धावा वसूल केल्या. पंड्याने 16 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 37 धावा कुटल्या.

त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून बंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं. एबी डिव्हिलियर्स आणि मोईन अलीच्या अर्धशतकांमुळे बंगलोरने सात बाद 171 धावांची मजल मारली. तर मुंबईच्या लसिथ मलिंगाने 31 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं.