मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान आज होत आहे. राज्यातील 10 मतदारसंघांसह देशभरातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात आज मतदान होईल. सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, प्रीतम मुंडे, आनंदराव अडसूळ यासारख्या दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.


दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक उमेदवार बीड मतदारसंघात (36) असून सर्वात कमी उमेदवार लातूर मतदारसंघात (10) आहेत. याव्यतिरिक्त बुलडाणा मतदारसंघात 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

अमरावती

शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. अडसूळ यापूर्वी पाच वेळा खासदार राहिले आहेत. आघाडीचा पाठिंबा असलेल्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा आनंदराव अडसूळांच्या विरोधात आहेत. 2014 मध्ये नवनीत राणा यांनी अडसूळांना जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे 2014 मधील हायव्होल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित.

अमरावती मतदारसंघात 2014 मध्ये 62.29 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 12 हजार 739 मतदारांपैकी 10 लाख 1 हजार 63 मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ 1 लाख 36 हजार 807 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 4 लाख 65 हजार 363 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या नवनीत राणा यांना 3 लाख 28 हजार 556 मतं मिळाली होती. यंदा हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकमेकासमोर उभे आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

1.    बडनेरा
2.    अमरावती
3.    तिवसा
4.    दर्यापूर
5.    मेळघाट
6.    अचलपूर

अकोला

अकोला मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल रिंगणात आहेत. एकूण 11 उमेदवार निवडणूक लढवत असले, तरी प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत आहे.

अकोल्यात एकूण 18 लाख 64 हजार 544 मतदार आहेत. अकोला मतदारसंघात 2014 मध्ये 58.51 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 72 हजार 643 मतदारांपैकी 9 लाख 78 हजार 630 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे संजय धोत्रे 2 लाख 3 हजार 116 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 4 लाख 56 हजार 472 मतं मिळाली होती. काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना 2 लाख 53 हजार 356 मतं मिळाली, तर भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना 2 लाख 38 हजार 776 मतं मिळाली होती. याच तीन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदासुद्धा लढत रंगणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

1. अकोला पश्चिम
2. अकोला पूर्व
3. अकोट
4. बाळापूर
5. मुर्तिजापूर (राखीव - अनुसूचित जाती)
6. रिसोड

बुलडाणा

बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे निवडणूक रिंगणात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कर हे सुद्धा निवडणूक लढत असल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे. बुलडाणा लोकसभेसाठी 2014 मध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कृष्णा इंगळे यांच्यात लढत झाली होती. त्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे दीड लाखांच्या फरकाने विजयी झाले होते.

गेल्या 10 वर्षांपासून बुलडाणा लोकसभेचे खासदार म्हणून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्या विषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली आहे. गेल्या 10 वर्षात जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प आणला गेला नाही. तसंच कुठलाही विकास झालेला दिसून येत नाही. अकोला जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा रेल्वे मार्गाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. शिवाय सिंचन, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारीसह अनेक प्रश्न कायम आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. अपेक्षित असलेली कामं आणि विकास न झाल्यामुळे नाराज मतदार पुन्हा प्रतापरावांना मत देण्याआधी नक्की विचार करतील. मात्र प्रतापराव जाधव हे मराठा समाजेचे उमेदवार असल्याने त्यांना फायदादेखील होऊ शकतो कारण मतदारांमध्ये जवळपास अडीच लाखांपेक्षाही जास्त संख्या मराठा समाजाची आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. मागील 2014 च्या  निवडणुकीत  61.35 टक्के मतदान झाले होते. मतदारांच्या संख्येत भर पडल्याने आजच्या मतदानाच्या टक्क्यांमध्ये वाढ अपेक्षित आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

1.    बुलडाणा
2.    चिखली
3.    खामगांव
4.    जळगाव जामोद
5.    सिंदखेडराजा
6.    मेहेकर

परभणी

पक्षांतराच्या शापातून यावेळी विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या रुपाने मुक्त झालेली परभणीची जागा, तर गेल्या 30 वर्षांचा लोकसभेचा गड शिवसेना शाबूत ठेवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी भावनिकतेच्या मोहात इथे सेनेने सत्ता राखली आहे. त्यामुळे सेनेच्या या तटबंदी किल्ल्याला पोखरून काढण्याचे कडवे आव्हान यंदाही राष्ट्रवादी समोर आहे.

परभणी लोकसभा सुरुवातीपासूनच जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार आहे. लोकसभेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला यावेळी राजेश विटेकर कितपत टक्कर देणार यावर प्रश्नचिन्ह आहे. तर संपूर्ण परभणी मतदार संघाचा विचार करता मराठा समाजाचे मतदान सर्वाधिक असले तरीही खालोखाल मुस्लिम, दलित, ओबीसी आणि इतर असे मतदानही निर्णायक असल्याने हे मतदार यंदा पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष नेमकं कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

2014 च्या निवडणुकीत लाख 3 हजार 792 मतदारांपैकी 11 लाख 62 हजार 371 मतदारांनी मतदान केलं होतं. त्यात संजय जाधव यांना 5 लाख 78 हजार 67 मतं पडली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांना 4 लाख 51 हजार 108 मतं पडली होती. संजय जाधव 1 लाख 26 हजार 959 मतांनी जिंकले होते.

परभणी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

परभणी
पाथरी
जिंतूर
गंगाखेड
परतूर
घनसावंगी

नांदेड

गेल्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. दोघंही जण यंदा पुन्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास अनुत्सुक होते. अखेर त्यापैकी एक असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. खरं तर नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ. मोदी लाटेतसुद्धा अशोक चव्हाण यांनी नांदेडची लढत जिंकली होती. मात्र यंदा शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकरांची टक्कर चव्हाणांना असेल. त्यामुळे अशोक चव्हाणांना आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे.

2014 साली या मतदारसंघात 16 लाख 87 हजार 57 मतदारांपैकी 6 टक्के म्हणजे 10 लाख 10 हजार 262 मतदारांनी मतदान केलं होतं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 81 हजार 455 मतांनी विजयी झाले होते. अशोक चव्हाण यांना 4 लाख 93 हजार 075 मतं पडली होती. तर भाजपच्या डी. बी. पाटील यांना 4 लाख 11 हजार 620 मतं पडली होती.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

भोकर
नांदेड उत्तर
नांदेड दक्षिण
नायगाव
देगलूर
मुखेड

हिंगोली

2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसला मिळालेली दुसरी जागा म्हणजे हिंगोली. या निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव विजयी झाले होते. मात्र शिवसेनेकडून लढलेल्या सुभाष वानखेडे यांनी राजीव सातवांना चांगलीच झुंज दिली होती. अवघ्या 1632 मतांनी वानखेडेंचा निसटता पराभव झाला होता. राजीव सातव यांना गुजरातचं प्रभारी पद मिळाल्याने त्यांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या सुभाष वानखेडे यांना काँग्रेसमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत पाटील रिंगणात उभे आहेत. 1986 सालापासून हेमंत पाटील हिंगोलीच्या राजकारणात सक्रीय आहेत. 2009 साली पाटील यांनी विधानसभा लढवत काँग्रेसच्या ओम प्रकाश पोखरणा यांचा पराभव केला होता. त्यामुळे शिवसेनेचे हेमंत पाटील काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंना कितपत टक्कर देतील हे पाहण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे. एका अर्थाने ही आजी-माजी शिवसैनिकांमधील लढत आहे.

हिंगोली मतदारसंघात 15 लाख 86 हजार 194 मतदार आहे. त्यापैकी 10 लाख 51 हजार 477 मतदारांनी मतदान केलं होतं. या निवणुकीत काँग्रेसच्या राजीव सातव यांचा अवघ्या 1632 मतांनी विजय झाला होता. सातवांना 4 लाख 67 हजार 397 मतं तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंना 4 लाख 65 हजार 765 मतं पडली होती.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

उमरखेड
किनवट
हादगाव
वसमत
कलमनुरी
हिंगोली

उस्मानाबाद

उस्मानाबादेतून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांना बाद करत ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे हडवैरी मानल्या जाणाऱ्या दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014 साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला होता.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

औसा (लातूर जिल्हा)
उमरगा (उस्मानाबाद जिल्हा)
तुळजापूर (उस्मानाबाद जिल्हा)
उस्मानाबाद (उस्मानाबाद जिल्हा)
परांडा (उस्मानाबाद जिल्हा)
बार्शी (सोलापूर जिल्हा)

बीड


बीडचा गड भाजपसाठी तुलनेने सोपा मानला जातो. 2014 मधील निवडणुकीत त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सुरेश धस यांचा गोपीनाथ मुंडे यांनी पराभव केला होता. 2009 पासून मुंडेंनी बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. यंदाही प्रीतम मुंडेंना भाजपने तिकीट दिलं असून राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

गेवराई
माजलगाव
बीड
आष्टी
केज
परळी

लातूर

लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करत सुधाकरराव शिंगारे यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने मच्छिंद्र कामंत यांना उतरवलं आहे. काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव करत गायकवाडांनी 2014 मध्ये निवडणूक जिंकली होती. 2009 मध्ये खरं तर सुनिल गायकवाडांचा निसटता पराभव झाला होता.

लातूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्र

लोहा (नांदेड जिल्हा)
लातूर ग्रामीण
लातूर शहर
अहमदपूर
उदगीर
निलंगा
संबंधित बातम्या :

Loksabha Election 2019 LIVE BLOG

दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या, राज्यातील 10 मतदारसंघात गुरुवारी (18 एप्रिल) मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Loksabha Election 2019 : चौथ्या टप्प्यामधील लढतींचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी चुरस

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कोणकोणत्या प्रमुख लढती?

विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा

शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' उमेदवारांना भिडणार

गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी