भोपाळ : देशभरातील महत्त्वाच्या लढतींमध्ये भोपाळ मतदारसंघाचा समावेश आहे. भोपाळ मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. भोपाळमध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरुद्ध काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यात सामना आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार साध्वी प्रज्ञा यांना 30 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. प्रज्ञा यांनी सेलिब्रेशनदेखील सुरु केले आहे.


भाजपने या मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सर्वांचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून साध्वी प्रज्ञा सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत होत्या, त्यामुळे भोपाळ मतदारसंघ चर्चेत राहिला आहे.

11 वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले माजी एटीएसप्रमुख हेमंत करकरेंबाबत आणि त्यानंतर बाबरी मशिदीबाबत साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गदारोळ माजला होता. देशभरातून साध्वी यांच्यावर टीकादेखील झाली. तरिदेखील मतदारांनी साध्वी यांच्या बाजूने कौल दिला आहे.