मुंबई : लोकसभेच्या सर्वात मोठ्या उत्सवाची आज सांगता होत आहे. लोकसभेच्या निकालाचे कल हाती येण्याआधीच उमेदवारांनी पोस्टरबाजी सुरु केली आहे. राज्यात ठिकठिकाणी उमेदवारांनी आपल्या विजयाचे बॅनर लावत विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मिठाईही तयार ठेवली आहे.
भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत विजय आपलाच होणार दावा केला आहे. उमेदवारांचं अभिनंदन करत मतदारांचे आभारही मानले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. आपल्या मतदारसंघात नवा खासदार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र काही ठिकाणी निकाल लागण्याआधीच आपल्या भावी खासदारांचे 'बॅनर' झळकत आहेत. पुण्यात लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांनी बापट यांना निकालाच्या आधीच खासदार करुन टाकले आहे. सोबतच त्यांचं अभिनंदनही केले आहे.
शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे देखील असेच बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरमध्ये अमोल कोल्हे यांना खासदार संबोधण्यात आलं आहे. निकालाआधीच कोल्हेंची खासदार म्हणून फ्लेक्सबाजी केली आहे. शिरुर आणि मावळ मतदारसंघाची मतमोजणी ज्या म्हाळुंगे- बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. त्याच्यासमोरच राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावर ही फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.
कल्याणमध्येही डॉ. श्रीकांत शिंदेंच्या नावाचे बॅनर लावण्यात आले आहेत. यात त्यांना खासदार संबोधत विजयी झाल्याबद्दल अभिनंदनही करण्यात आलं आहे.