रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत. ते उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना भाजपकडून माढ्याची उमेदवार देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यामुळे बराच काळ चर्चेत असलेल्या माढा लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. माढामधून आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपकडून नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे. माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी नंतर माघार घेतली. यामुळे या जागेवर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची दावेदारी मानली जात होती. मात्र त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा पत्ता कट झाला. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्या नावाची घोषणा खुद्द शरद पवार यांनी केली. संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे भाऊ आहेत.
मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे.
कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर
सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष
अडीच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड
खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव
स्वराज उद्योग समुहाची स्थापना
स्वराज्य उद्योग समुहातून युवकांची फौज
1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीकडून हिंदुराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी
कोण आहेत संजय शिंदे?
- शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
- माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
- निमगाव 'टेंभुर्णी'च्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात
- 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव
- जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.
- पालकमंत्री विजय देशमुख यांच्या मदतीने अध्यक्ष झाले.
- म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष.
- माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन - जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवलं.