मुंबई : शिवसेनेचे उस्मानाबादमधील खासदार रवींद्र गायकवाड यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्यामुळे गायकवाड समर्थकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गायकवाड यांचे समर्थक आंदोलन करण्यासाठी शनिवारी रात्री उस्मानाबादहून मुंबईकडे रवाना झाले. परंतु याबाबतची माहिती मिळताच मध्यरात्री एकच्या सुमारास पोलिसांनी या आंदोलक शिवसैनिकांना तुळजापूर येथे अडवून परत पाठवले. परंतु गायकवाड समर्थकांनी इतर वाहनांची व्यवस्था करत रात्री पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. गायकवाड समर्थक आज मुंबईत मातोश्री या निवसस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजीनामे देणार आहेत.
लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर गायकवाडांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला होता. या मेळाव्यात ठरल्याप्रमाणे गायकवाडांचे समर्थक असलेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपआपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तुळजापूर येथे मध्यरात्री एकच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवल्या. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पिटाळण्यात आले. तरिही रातोरात इतर वाहनांची व्यवस्था करुन अनेक कार्यकर्ते पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाले.
शिवसेनेने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार सर्वच विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी मात्र रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात चपलेने मारहाण केल्याने गायकवाड वादात सापडले होते. या वादामुळेच उस्मानाबादमधून शिवसेनेने गायकवाड यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे.
आंदोलनासाठी निघालेल्या उस्मानाबादच्या शिवसैनिकांना पोलिसांनी माघारी धाडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2019 11:09 AM (IST)
शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -