बीड : घटक पक्ष म्हणून राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसंग्राम पक्षाने बीड जिल्ह्यात मात्र कायम भाजपपासून दोन हात अंतर ठेवले आहे. अगदी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे काम करणार नाही, असा पवित्रा विनायक मेटे यांनी घेतला त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात एक आणि बाहेर एक असं करता येणार नाही, असा अल्टीमेटम दिला होता.


मात्र आता मेंटेना पंकजा मुंडेंनी त्यांना जोरदार धक्का दिला आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे एकूण चार सदस्य निवडून आले होते. त्यातील एक यापूर्वीच भाजपाच्या मांडवाखाली आला आहे. आता आणखी दोन म्हणजे विजयकांत मुंडे आणि अशोक लोढा या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला

शिवसंग्राम पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना विनायक मेटेंपासून दूर करण्यात यापूर्वीच पंकजा मुंडेंना यश आलं होतं. आता उर्वरित दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपात घेऊन पंकजा मुंडेंनी विनायक मेटे यांना चेकमेट केलं आहे. दुसरीकडे भाजपसोबत असलेले घटक पक्ष नाराज आहेत, अशा चर्चा होत असतानाच काल मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षातील सर्व सदस्यांसोबत एक बैठक घेऊन नाराजी दूर केल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री तिकडे घटक पक्षांच्या नाराज नेत्यांची मनधरणी करत होते असताना इकडे मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडून मेटेंना आव्‍हान दिलं आहे.