नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी दोन प्रकरणांमध्ये क्लीनचिट दिली आहे. मोदींनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक कायद्याचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन केलेलं नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मोदींनी 23 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये रोड शोचं आयोजन केलं होतं, जे आचारसंहितेचं उल्लंघन होतं, असा आरोप कॉंग्रेसने केला होता.

निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये 9 एप्रिल रोजी मोदींनी केलेल्या प्रचारसभेतील भाषणात नवीन मतदारांना बालाकोट हल्ल्यातील शहीदांना समर्पित करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीनचिट दिली आहे. याच दिवशी महाराष्ट्रातील लातूरच्या औसामध्ये देखील मोदींनी असेच आवाहन केले होते.



आयोगाने या प्रकरणी देखील त्यांना क्लीनचिट दिली होती. या प्रकरणात दिलेल्या क्लीनचिटबाबत एका निवडणूक आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.

आयोगाने अद्याप या दोन्ही प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही प्रकरणांसह आतापर्यंत आठ प्रकरणांमध्ये मोदींना क्लीनचिट दिली आहे.

आयोगाकडून अमित शाहांना दोनदा तर राहुल गांधींना एकदा क्लीनचिट  

गुजरात निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रथमदर्शनी अशा पध्दतीचं कुठलंही उल्लंघन केल्याचे आढळलेले नाही. मोदींनी मताधिकार बजावल्यानंतर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत रोडशो केला होता आणि राजकीय भाष्य केलं होतं, असा आरोप कॉंग्रेसने केला होता. निवडणूक आयोगाने आधी अशा प्रकारे तक्रार आलेल्या नरेंद्र मोदींच्या सहा, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या दोन तर राहुल गांधी यांच्या एका भाषणाला क्लीनचिट दिली आहे.