मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारात 18 सभा आणि 1 रोड शो घेतला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठं यश मिळवल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीला 29 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभांचा फायदा महायुतीला झाला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. नरेंद्र मोदी यांनी राज्यात जिथं सभा घेतल्या तिथं राज्यात काय स्थिती झाली कोण जिंकलं कोण पराभूत झालं हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी कुठं सभा घेतल्या?
चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदी यांनी सुधीर मुनंगटीवार आणि गडचिरोलीतील उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी प्रचाराची सभा घेतलीहोती. या दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि नामदेव किरसान यांचा विजय झाला.
नागपूरमध्ये नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी, राजू पारवे आणि सुनील मेंढे यांच्यासाठी सभा घेतली होती. ही सभा नागपूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेण्यात आली होती. यापैकी नितीन गडकरी विजयी झाले. तर, रामटेकमध्ये राजू पारवे आणि सुनील मेंढे पराभूत झाले रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि भंडारा गोंदियात प्रशांत पाडोळे यांनी विजय मिळवला.
वर्धा येथे नरेंद्र मोदी यांनी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा आणि वर्धा येथील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी सभा घेतली होती. या सभेनंतरही भाजपला फायदा न झाल्याचं चित्र आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीनं विजय मिळवला. अमरावती काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे विजयी झाले.
मोदींनी कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी सभा घेतली होती. कोल्हापूरमधील सभेचा संजय मंडलिक यांना फायदा झालेला दिसत नाही. संजय मंडलिक यांच्या काँग्रेसच्या शाहू छत्रपती यांनी पराभव केला. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांनी विजय मिळवला. इथं त्यांनी राजू शेट्टी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.
मोदींनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात स्वंतत्रपणे दोन सभा घेतल्या होत्या. या दोन्ही संघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूरमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या.
नरेंद्र मोदींनी सातारा लोकसभा मतदारसंघात कराड येथे उदयनराजे भोसले यांच्यासाठी कराडमध्ये सभा घेतली. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना पराभूत केलं आहे.
पुण्यात नरेंद्र मोदींची सभा मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी झाली होती. यापैकी मुरलीधर मोहोळ आणि श्रीरंग बारणे यांनी विजय मिळवला. शिरुरमधून अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. तर, सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पराभव झाला.
धाराशिवमध्ये मध्ये नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला,
लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली होती. मात्र, इथं काँग्रेसच्या शिवाजीराव काळगे यांनी विजय मिळवला.
नंदुरबारमध्ये नरेंद्र मोदींनी हिना गावितसाठी प्रचारसभा घेतली होती. मात्र, काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा दारुण पराभव केला.
मोदींनी अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखेंसाठी प्रचारसभा घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांनी सुजय विखेंना पराभूत केलं.
नाशिकमध्ये नरेंद्र मोदींनी सेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भारती पवार यांच्यासाठी सभा घेतली होती. येथे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. नाशिकमधून राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीतून भास्कर भगरे विजयी झाले आहेत.
कल्याणमध्ये नरेंद्र मोदींनी श्रीकांत शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. इथं कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विजयी झाले. तर, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
संबंधित बातम्या :
Beed Loksabha : बजरंग सोनवणेंचा मोठा विजय, हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव