Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात वारं फिरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकहाती बहुमत मिळालं आहे. राज्यात अनेक मतदारसंघात काही पक्षांकडून उमेदवार बदलण्यात आले होते. महाराष्ट्रात उमेदवार बदलेल्या जागेवर कुणाचा विजय झाला आहे, हे जाणून घ्या. यादरम्यान, हिंगोलीमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आहेत, तर शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर यांचा पराभव झाला आहे.
हिंगोलीत शिंदे गटाचे उमेदवार पराभूत
हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करुन त्यानंतर बाबूराव कोहळीकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या पहिल्या यादीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर हिंगोलीमध्ये कमालीचा रोष निर्माण पाहायला मिळाला होता. यानंतर भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली आहे. हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली.
अकोल्यामध्ये भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी
अकोल्यात भाजपचे अनूप धोत्रे विजयी ठरले आहेत. अकोल्यात भाजपने उमेदवार बदलला होता. भाजपने संजय धोत्रे यांची उमेदवारी बदलून अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना तिकीट दिलं होतं. 2019 मध्ये अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) निवडून आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संजय धोत्रे यांची प्रकृती खालावली आहे. अंथरुणाला खिळून असल्याने ते बराच काळ सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे अकोला दौऱ्यावर आले होते. तेव्हाही खासदार संजय धोत्रे हे अकोल्यातील भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे भाजप नेतृ्त्त्वाने संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं.
सांगलीत विशाल पाटील यांना जनतेचा कौल
सांगली लोकसभेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. सांगली लोकसभेवरूनही महाविकास आघाडीमध्ये तिढा पाहायला मिळाला होता. सुरुवातीला काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावला जात होता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. सांगलीची जागा काँग्रेसला न सुटल्याने विशाल पाटील यांनी वेगळा निर्णय घेत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी विजयाचा व्यक्त केलेला विश्वास खरा ठरला आहे.
यवतमाळ-वाशिम
वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक (Loksa Sabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. वंचित बहुजन आघाडाने यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Nashik) या लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार बदलला. येथे नव्याने अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना तिकीट देण्यात आलं. यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी अगोदर सुभाष खेमसिंग पवार यांना तिकीट दिले होते. उमेदवारी मिळाल्यानंतर खेमसिंग यांच्याकडून जोमात प्रचार केला जात होता. मात्र वंचितने ऐनवेळी खेमसिंग पवार यांना माघार घ्यायला लावली.
संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी
वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) मुंबई उत्तर पश्चिम (Mumvai North Weat Constituency) मतदारसंघातून उमेदवार बदलला होता. संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आधी भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजीव कलकोरी हे उमेदवार होते, नंतर त्यांच्याऐवजी परमेश्वर रणशूर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं.
जळगाव
वंचित बहुजन आघाडीने जळगावात उमेदवार बदलला होता. जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) सुरुवातीला वंचितकडून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी माघार घेतल्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी युवराज जाधव (Yuvraj Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
दिंडोरी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा दारुण पराभव झाला आहे. भास्कर भगरे यांनी ही निवडणूक लढताना आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढली होती, त्यामुळे हा जनशक्तीचा विजय असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भगरे सर याच नावाने एक डमी उमेदवार भाजपने उतरवला होता त्यामुळे त्यांना एक लाख मते अपक्ष भगरे सर यांना मिळाली केंद्रीय मंत्र्यांनी हा माझ्या विरोधात डाव टाकला होता त्यामुळे माझे मताधिक्य कमी झाले असे देखील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार भास्कर भगरे यांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान, दिंडोरी लोकसभेसाठी वंचितने गुलाब बर्डे (Gulab Barde) यांना सुरुवातीला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागी मालती थविल (Malati Thavil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.