Lok Sabha Election Candidate Expenditure Limit : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Dates) जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता इच्छुक उमेदवार देखील कामाला लागले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत किती पैसे खर्च करावे यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादापेक्षा अधिकच खर्च उमेदवाराला करता येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 95 लाख अशी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2014 पर्यंत ही मर्यादा 70 लाख होती. 


आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याच्ची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. याकरीता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल.  मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल.  लोकसभा निवडणुकीकरीता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे.  तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 40 लाख इतकी आहे.


जाहिरातीवर लक्ष राहणार...


राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत.  त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्‍त होणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 


तक्रारींसाठी मोबाईल ॲप


आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. विशेष अशी तक्रार आल्यास 100 तासाच्या आत त्या तक्रारींचा निपटारा केला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 


राज्यात निवडणुका कधी होणार?


पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5 मतदारसंघ)


दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ संख्या 8 आहे) 


तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ संख्या 11 आहे)


चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ संख्या 11 आहे)


पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ संख्या 13 आहे)


इतर महत्वाच्या बातम्या : 


ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान कधी होऊ शकते?; एवढे उमेदवार असल्यास घेतला जातो निर्णय